‘त्या’ तिघांचा नाल्यात पडून मृत्यू
विजापूर येथील घटना उघडकीस : नातेवाईकांचा आक्रोश
विजापूर : शहरातील गच्चीनकटी कॉलनीतील एक मुलगी व दोन मुले रविवारी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. त्यांचा शोध घेण्याचे कार्य सुरु होते. त्या सर्वांचे मृतदेह सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या घाण पाणी शुद्धीकरण केंद्राच्या नाल्यात सापडले आहेत. अनुष्का अनिल दहिहंडे (वय 9, रा. गदग), विजय अनिल दहिहंडे (वय 7, रा. गदग) व मिहीर जानगवळी (वय 6, विजापूर) अशी मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकांची नावे आहेत. घटनेविषयी अधिक माहिती अशी, अनुष्का, विजय व मिहीर हे गल्लीमध्ये उंट आल्याने त्यांच्या मागे गेले होते. त्यानंतर ते गल्ली सोडून अन्य ठिकाणी पोहचले. त्यांना घराकडे येता आले नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. त्यामुळे दहिहंडे व जानगवळी कुटुंबीयांनी मुले बेपत्ता झाल्याची तक्रार एमीएमसी पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात मुलांचा शोध घेतला. सोमवारी तिन्ही मुलांचे मृतदेह इंडी रोडवरील शांतिनिकेतन शाळेजवळील मनपाच्या घाण पाणी शुद्धीकरण केंद्राच्या नाल्यात सापडले. यावेळी दोन्ही पुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता.