महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इराण-इस्रायल युद्धाचा धोका

06:50 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताने जारी केला हेल्पलाईन नंबर : इराणी नौदलाने ओमानच्या आखातात इस्रायलचे जहाज घेतले ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढत आहे. येत्या एक-दोन दिवसात इराण इस्रायलवर हल्ला करू शकतो, असा दावा केला जात आहे. हल्ल्याची योजना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याशी शेअर केली गेली आहे. ते त्याच्या संभाव्य परिणामाचे मूल्यांकन करत आहेत. याचदरम्यान इस्रायल आपल्या उत्तर आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी इराणच्या हल्ल्याला तोंड देण्याची तयारी करत आहे.

1 एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी दुतावासाजवळ हवाई हल्ला केला. यामध्ये इराणच्या दोन सर्वोच्च लष्करी कमांडरसह 13 जण मारले गेल्यानंतर इराणने बदला म्हणून इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासह अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. यामध्ये नागरिकांना इराण आणि इस्रायलमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय हवाई यंत्रणेने आपल्या काही विमानफेऱ्यांच्या मार्गात बदलही केला आहे.

इराण इस्रायलला करणार लक्ष्य

इराण नजिकच्या काळात इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अनेक ठिकाणांना लक्ष्य करेल. इराणचा हल्ला टाळण्यासाठी अमेरिका इस्रायलला मदत करेल, असे ‘टाईम्स ऑफ इस्रायल’ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. इराणमध्ये क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनशी संबंधित मोठ्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला आहे. साहजिकच हा हल्ला इराणच्या भूमीतून होऊ शकतो, असा दावाही केला जात आहे. इराण 100 हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे सुसज्ज करत आहे. इराण आपल्या सीमेच्या आतून इस्रायलवर हल्ला करेल असे संकेत आहेत. तथापि, इराण स्वत:च्या भूमीवरून हल्ला करण्यासाठी क्षेपणास्त्रे तैनात करत आहे की इस्रायल-अमेरिकेचा हल्ला टाळण्यासाठी तयारी करत आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

दोन्ही देशातील वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेने आपली युद्धनौका इस्रायलला पाठवली आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका युएसएस ड्वाइट आयझेनहॉवर लाल समुद्रमार्गे इस्रायलला पोहोचत आहे. इराणने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखण्यास ही युद्धनौका सक्षम आहे. मध्यपूर्वेतील 8 देशांमध्ये अमेरिकन सैनिक तैनात आहेत. युद्ध झाल्यास ते इस्रायलला मदत करतील, असा होराही व्यक्त केला जात आहे. या सर्व गतिमान घडामोडींदरम्यान इराणी नौदलाने ओमानच्या आखातात इस्रायलचे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणने पकडलेले सदर जहाज मुंबईत येत होते. ‘एमएससी एरीज’ असे या जहाजाचे नाव असून त्याच्यावर 20 क्रू मेंबर्स उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व कर्मचारी फिलिपाईन्सचे नागरिक आहेत.

हल्ला न करण्याचा अमेरिकेचा सल्ला

शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाबाबत इराणला इशारा दिला. ‘हल्ला करू नका’ असा इशारा देतानाच वेळप्रसंगी आम्ही इस्रायलचे रक्षण करू. आमचा इस्रायलला पाठिंबा आहे, असे बायडेन म्हणाले. इराण आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होणार नसल्याचे अमेरिकन इंटेलिजन्सशी संबंधित तज्ञांचे म्हणणे आहे.

हेल्पलाईन क्रमांक जारी

इराणमधील भारतीय दुतावासाने तणावाच्या परिस्थितीत भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे. इराणमध्ये सुमारे 4,000 भारतीय राहतात. तसेच 18,500 अनिवासी भारतीय इस्रायलमध्ये वास्तव्यास आहेत. अलिकडेच भारतातून 6 हजार कामगारांना बांधकामासाठी इस्रायलला पाठवण्यात आले. मात्र, इस्रायलमधील भारतीय दुतावासाने अद्याप कोणतीही सूचना जारी केलेली नाही. दरम्यान, हल्ल्याच्या शक्यतेमुळे नेदरलँड्सने तेहरानमधील आपला दुतावास तात्पुरता बंद केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article