बांगलादेशात कालीमाता मुकुटची चोरी
पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी केला होता अर्पण, बांगला देशकडे तीव्र निषेध व्यक्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये त्यांच्या बांगलादेशच्या दौऱ्यात त्या देशातील सतखिरा येथील कालीमातेच्या मूर्तीला अर्पण केलेल्या रत्नजडित मुकुटाची चोरी झाली आहे. कालीमातेची ही मूर्ती जेशोरेश्वरी मंदिरातील असून तिच्या दर्शनासाठी भारतातूनही मोठ्या प्रमाणात भाविक बांगलादेशात जात असतात. यंदा प्रथमच बांगला देशात नवरात्रोत्सव जाहीररित्या साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच दुर्गामातेचे मंडप उभे करायचे असतील तर ‘जिझिया कर’ द्यावा लागेल, असा आदेश प्रशासनाने काढला होता. या नवरात्रोत्सवाच्या काळात कालीमातेच्या मुकुटाची चोरी झाल्याने तेथील हिंदू संतापले आहेत.
गेल्या गुरुवारी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या आसपास या मुकुटाची चोरी झाली, अशी माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी तसेच मौल्यवान रत्ने जडविलेला हा मुकूट होता. मंदिराचे प्रमुख पुजारी दिलीप मुखर्जी यांनी ही बाब उघड केली. ते बुधवारी रात्रीची पूजा करुन घरी परतले. त्यानंतर मध्यरात्री दोन नंतर मुकूट चोरीला गेला. पहाटे चार वाजता मंदिराची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी मुखर्जी यांना ती कळविली. या चोरी प्रकरणी पोलिसात तक्रार सादर करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फूटेजची तपासणी
मंदिरात सीसीटीव्ही बसविलेले असल्याने चोरी कोणी केली, हे उघड होणे अशक्य नाही, असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात आहे. पोलिसांनीही हे फूटेज ताब्यात घेतले असून पुढील चौकशी केली जात आहे. कालीमातेच्या 51 शक्तीपीठांपैकी हे एक शक्तीपीठ असल्याने त्याचे महत्व मोठे आहे. परिणामी, या चोरीचा शोध लावण्याचा दबाव पोलिसांवरही आहे.
नवरात्राच्या काळातच...
सध्या हिंदूंचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पश्चिम बंगाल आणि बांगला देशात तो अधिकच मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सवाच्या काळात ही चोरी घडल्याने बांगला देश आणि भारतातील हिंदू समाजातही संतापाची भावना निर्माण झाली आहे. बांगला देशात शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून तेथे हिंदूंवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कालीमातेच्या मुकुटाची चोरी हा हिंदूंच्या धर्मभावना दुखविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असा आरोप होत असून बांगला देशच्या सध्याच्या सरकारला त्यासाठी जबाबदार धरले जात आहे. हिंदूंचे संरक्षण करण्यात हे सरकार अक्षम असल्याची टीका भारत आणि बांगला देशमधील हिंदू संघटना करीत आहेत. बांगला देशात यंदा प्रथमच जाहीररित्या नवरात्रोत्सव साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली असून दुर्गामातेचे मंडप उभे करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
उच्चायोगाचा तीव्र आक्षेप
बांगला देशमधील भारतीय उच्चायोगाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या चोरी प्रकरणाचा तपास त्वरित करुन हिंदूंच्या भावना जोडला गेलेला हा मुकूट परत मिळवा आणि तो सन्मानाने कालीमेच्या शीरावर स्थानापन्न करा, अशी सूचना भारताच्या उच्चायोगाने बांगला देशच्या सरकारला केली आहे.
मंदिराचे महत्व मोठे
कालीमातेच्या या मंदिराची निर्मिती 12 व्या शतकाच्या उत्तरार्धात करण्यात आली आहे. हे ऐतिहासिक मंदीर असून भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. नंतर 13 व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. नंतर महाराजा प्रतापादित्य यांनी 16 व्या शतकात या मंदिराचे पुनर्निर्माण केले, असा इतिहास आहे.