कडोलीत भटक्या कुत्र्यांची दहशत
शाळकरी मुले, मॉर्निंग वॉकर्स, लहान-थोर मंडळी, रात्री कामावरुन परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा
वार्ताहर/कडोली
कडोली गावासह उपनगरात वाढत चाललेली भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वांसाठी जटील समस्या बनली असून दिवसेंदिवस आता कुत्र्यांची दहशत शाळकरी मुलांसाठी, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लहान-थोर मंडळींसाठी आणि रात्री अपरात्री कामावरुन परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा बनू पाहत आहे. तरी कडोली ग्राम पंचायतीने कार्यक्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या सर्व ठिकाणी वाढत चाललेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि लहान शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही भटकी कुत्री अंगावर धावून जाणे, जखमी करणे, असे प्रकार वाढीस लागले आहेत. कडोलीसह उपनगरात भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वांसाठी धोक्याची घंटा बनली आहे. कडोली गावच्या पश्चिमेला गावाबाहेरील आमराईत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असल्याने लहान शाळकरी मुलांना जीव मुठीत घेवून शाळा गाठावी लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचे कळप फिरत असतात. हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवरच ही कुत्री अंगावर धावून जातात. त्यामुळे त्यांची कळ काढणे देखील अवघड बनले आहे. कडोली-जाफरवाडी, कडोली-अगसगा, कडोली-देवगिरी, कडोली-होनगा, कडोली-काकती या सर्व रस्त्यारुन मॉर्निंग वॉकिंगसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली होती.
परंतु या सर्व रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत आहेत. त्यांची दहशत वाढल्यामुळे मॉर्निंग वॉकींगसाठी जाणाऱ्यांची संख्या घटत चालली आहेत. या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तेव्हा ही परिस्थिती अशीच राहिली की पहाटेवेळी बाहेर पडणेही अवघड बनणार आहे. शिवाय कडोली उपनगरातून बेळगाव शहरात विविध कामांसाठी कर्मचारी जातात. ते कर्मचारी रात्री अपरात्रीच्या वेळी परतत असताना ही भटकी कुत्री अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रभर गोंधळ : बंदोबस्त करण्याची मागणी
कुत्र्यांची एवढी संख्या वाढली की रात्रभर संपूर्ण गावात आणि उपनगरात कुत्र्यांची कळपे जोरजोरात भुंकणे, रडणे, एकमेकांमध्ये भांडणे असा गोंधळ घालत असतात. त्यामुळे सर्वसामान्यांची झोप उडत चालली आहे. याचा विशेष करून वयोवृद्ध व्यक्तीमध्ये झोपेचे प्रमाण कमी असते. अशातच भटक्या कुत्र्यांच्या गोंगाटामुळे झोप लागणे देखील अवघड झाले आहे. तेंव्हा या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आता मोठी गरज बनली आहे. कडोली ग्रा. पं.ने याकडे जातीने लक्ष घालून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.