पुलाची शिरोलीतील दहशत अन् पैशाचा माज...
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोरलेली दाढी..,. गॉगल, हातावर टॅटू, गळ्यात सोनसाखळ्या, या साखळ्या सगळ्या गावाला दिसाव्यात म्हणून शर्टाची दोन बटणे उघडी.., कानाला कायम मोबाईल, मागे-पुढे चौघे-पाच जण सावलीसारखे.. आणि आपले अस्तित्व दाखवण्यासाठी कायम काहीतरी राडा करायचा, हे ठरलेले. अशा स्क्रॅप गॅंगने हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरातले सारे वातावरण बिघडवून टाकले आहे. त्यातल्या तिघा-चौघा जणांकडे स्क्रॅप मधून मिळवलेला सोन्यासारखा पैसा आहे. निव्वळ त्या पैशाच्या बळावर त्यांचा दहशतीचा हा खेळ सुरू आहे. त्यात या तिघा-चौघांपैकी एखादा संपला तर तो त्यांचा भाग आहे. पण त्यांच्या पाठीमागे असणारी इतर गोरगरिबांची मध्यमवर्गायांची पोरंच दाणीला जाऊ लागली आहेत. पण या गॅंगने शोबाजीवर पैसा खर्च करून आजूबाजूच्या तरुणाईत आपली एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे.
छोटे-छोटे उद्योग करून तरुणांनी व्यवसायात पडण्यात काहीही गैर नाही. अनेक जण तसे चांगले जगतातही. पण पुलाची शिरोली, गोकुळ शिरगाव परिसरात स्क्रॅपच्या व्यवसायात पडलेले तिघे, चौघेजण त्या पैशावर स्क्रॅप किंग बनू पाहत आहेत. सगळे स्क्रॅप व्यावसायिक या प्रवृत्तीचे नक्कीच नाहीत. ते कष्टाने आपला व्यवसाय करत आहेत. पण या ठराविक चार-पाच जणांत पैसा मिळवण्याची आणि त्या पैशावर आपले वजन वाढवण्याची स्पर्धाच लागली आहे. काही वर्षांपूर्वी एकत्रित असणारे हे या स्पर्धेतून वेगवेगळे झाले आहेत आणि आपापले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या नादात दुसऱ्याचे अस्तित्व वेगवेगळ्या प्रयत्नातून संपवू लागले आहेत. त्यातून दहशतीचा मोठा भडका उडाला आहे. रात्री-अपरात्री घरावर हल्ल्यापासून ते गावठी कट्ट्यातून गोळीबारापर्यंत मजल गेली आहे. सहज मिळालेल्या पैशातून कसा माज चढतो, याचे हे उदाहरण आहे.
अशा स्पर्धेत हे काहीजण आपापसात भांडत राहिले तर तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. पण त्यांनी आपल्या जोडीला आजूबाजूच्या मध्यमवर्गीय तरुणांना ओढून घेतले आहे. या तरुणांना त्यांचा गॉगल, गाड्या, त्यांचे मोबाईल, त्यांच्या गळ्dयातल्या मोठ्या साखळ्या, त्यांचा वारेमाप खर्च, चैनी आणि दादागिरीची नक्कीच भुरळ पडली आहे. या स्क्रॅप गँगची उठ-बस राजकारणी मंडळीतही आहे. कोणा पुढाऱ्याचा वाढदिवस असला की त्याला त्यांच्याकडून चांदीची कुऱ्हाड, चांदीची तलवार, चार-पाच फुटाचा फुलाचा गुच्छ, केक, फटाक्याची सलग पंधरा मिनिटे चालणारी आतषबाजी ठरलेली आहे. त्यामुळे पुढाऱ्यांनाही अशी गॅंग आपल्या पाठीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हवीच आहे.
अशाच एका गँगने 25 वर्षांपूर्वी शिरोलीत चोरट्या चांदीच्या विटाचा राज्यभर गाजलेला धमाका केला होता. ज्यावेळी एके 47 हे नावही माहित नव्हते. त्यावेळी शिरोलीत एके 47 च्या गोळ्यांचा सडा पडला होता. साऱ्या राज्यात हा प्रकार गाजला होता. त्यावेळच्या अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख मीरा बोरवणकर यांनी शिरोलीत तळ ठोकून त्या गुंडांची धिंड काढण्याचे धाडस दाखवले होते.
आता या चार-पाच जणांच्या स्क्रॅप गँगने पुन्हा तशी दहशत सुरू केली आहे. पोलिसांनी आत्ताच कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
गावात रुबाब करणाऱ्या फुटकळ गुंडांची गावातूनच सगळ्यांसमोर तपासाच्या निमित्ताने धिंड काढली तरी त्यांचा रुबाब उतरू शकणार आहे. आता तर गांजा म्हणजे, किलोभर वजन असणाऱ्याच्या अंगात दहा किलोचे तात्पुरते बळ आणणाऱ्या गांजाचा शिरोलीत शिरकाव झाला आहे. या मोठ्या गुंडांकडे कोर्ट-कज्जा खेळण्यासाठी पैसा आहे. त्यात त्यांचे काय व्हायचे ते होईल. पण या गॅंगची भुरळ पडलेल्या शिरोलीतील मध्यमवर्गीय पोरांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य बघता-बघता उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे पोलीस त्यांच्या पातळीवर ठीक आहे. पण शिरोलीतल्या सर्व ज्येष्ठांनी, युवक संघटनांनी, उद्योजकांनी व सर्व जबाबदार घटकांनी शिरोली वाचवण्याची नक्कीच गरज आहे.