उपायुक्त साधना पाटील यांच्यासह 7 जणांना नोटीस
कोल्हापूर :
महापालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणी पुरवठा, इस्टेट, परवाना विभाग व विभागांच्या वसुलीचा सोमवारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आढावा घेतला. यामध्ये नगररचना, पाणीपट्टी, परवाना, इस्टेट विभाग, परवाना विभाग या विभागांची वसुली केवळ 25 टक्के असल्याने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी 7 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या. यामध्ये सहाय्यक संचालक नगररचना विनायक झगडे, उपायुक्त साधना पाटील, जल अभियंता हर्षजीत घाटगे, कर निर्धारक सुधाकर चल्लावाड, इस्टेट ऑफीसर विलास साळोखे, परवाना अधिक्षक अशोक यादव, रवका अधिकारी तसेच प्रभारी पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत यांचा समावेश आहे.
नगररचना विभागास 79 लाख 88 हजार रुपयांची वसुली होणे अपेक्षीत असताना केवळ केवळ 39 टक्केच वसुली झाली आहे. यामुळे सहाय्यक संचालक नगररचना विनायक झगडे यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. घरफाळा विभागास 101 कोटी रुपयांची वसुली अपेक्षीत असताना 8 महिन्यांमध्ये केवळ 37 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. 75 टक्के वसुली होणे अपेक्षीत असताना केवळ 36 टक्के वसुली झाली असल्याने करनिर्धारक सुधाकर चल्लावाड यांना नोटीस बजावण्यात आली आहे. इस्टेट विभागास 38 लाख 19 हजार रुपयांच्या वसुलीचे टार्गेट असताना केवळ 9 लाख 62 हजार रुपयांची वसुली झाली असल्याने उपआयुक्त साधना पाटील यांच्याकडे इस्टेट विभागाची जबाबदारी असतानाही या विभागाची वसुली कमी असल्याने उपआयुक्त साधना पाटील व इस्टेट ऑफीसर विलास साळोखे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. परवाना विभागाकडे यंदा 5 कोटी 10 लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये केवळ 1 कोटी 25 लाख रुपयांची वसुली झाली असल्याने परवाना अधिक्षक अशोक यादव यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
शहर पाणीपुरवठा विभागास यंदा 91 लाख 46 हजार रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र या विभागाची वसुली केवळ 22 लाख 74 हजार रुपये इतकीच झाली आहे. यामुळे जल अभियंता हर्षजीत घाटगे व प्रभारी पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
आढावा बैठकीत सुचना
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी दुपारी वसुलीच्या सर्व विभागांची बैठक घेवून 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घरफाळा विभागाने रिव्हीजन झालेल्या मिळकतींना कर आकारणी करण्याच्या सूचना दिल्या. नगररचना विभागाचे उद्दिष्ट 100 कोटींवर नेण्याच्या सूचना दिल्या. यासाठी आतापासून वेळोवेळी कॅम्पचे आयोजन करा. नगररचना विभागाने प्रलंबित फायलींचा वेळावेळी निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. इस्टेट विभागाने मागील वर्षी गाळयांना दर निश्चित करुन दिले असल्याने थकीतसह वसुली वाढवा,तसेच थकबाकीदारांना नोटीसा काढून गाळे सिल करण्याच्या सूचना दिल्या. पाणी पुरवठा विभागावर महापालिकेचा सर्वात जास्त खर्च होत असून त्याप्रमाणे त्यांची वसुली होत नाही. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे आताच सर्व शासकीय कार्यालयांना अतिरिक्त आयुक्तांच्या सहीने डीओ लेटर काढा. तसेच मोठया थकबाकीदरांवर कारवाई करण्याच्या सूचना जल अभियंता यांना देण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, उज्वला शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना विनय झगडे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, स्थानिक संस्था कर अधिक्षक विश्वास कांबळे, रचना व कार्यपध्दती अधिक्षक प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, परवाना अधिक्षक अशोक यादव उपस्थित होते.