सावगावमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत कायम
आणखी एकाचा घेतला चावा, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण : कुत्र्याला पकडण्यासाठी गावातील युवकांचा पुढाकार
बेळगाव : सावगावमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत अद्यापही कायम आहे. शुक्रवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने आणखी एका इसमाचा चावा घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण त्याला पकडण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्याने गावातील तरुणांनी कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी धडपड चालविली आहे. मोतीराम बसरीकट्टी (वय 62) राहणार सावगाव असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. गेल्या आठ दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने गावात धुमाकूळ घातला आहे. शाळकरी मुले, महिला, त्याचबरोबर दिसेल त्यांचा कुत्र्याने चावा घेण्यास सुरुवात केली असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
इतकेच नव्हे तर त्या कुत्र्याने जनावरांसह अन्य काही कुत्र्यांचाही चावा घेतला आहे. त्यामुळे गावातील इतर कुत्रीही बाधित होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्राम पंचायतीकडून कुत्र्याचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील तरुणांनी कुत्र्याला पकडण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. दिवसा तसेच रात्रीच्या वेळी कुत्र्याचा शोध घेतला जात आहे. पाळीव कुत्र्यांचा चावा घेण्यात येऊ नये यासाठी नागरिकांनी पाळीव कुत्री घरात बांधून ठेवावीत, त्यांना बाहेर सोडू नये, असे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर ज्या जनावरांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे त्यांनी ग्राम पंचायतीशी संपर्क साधावा, संबंधित शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुसंगोपन खात्याला कळविण्यात येईल, असे आवाहन केले जात आहे.
सकाळच्या वेळेत कुत्र्याकडून चावा
विशेष करून पिसाळलेल्या कुत्र्याने सकाळच्या वेळी नागरिकांचा चावा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल सहा जणांचा चावा घेतल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्रा घरात शिरेल, या भीतीने ग्रामस्थ दरवाजा बंद करून घरी रहात आहेत. तसेच मुलांना शाळेपर्यंत सोडून पुन्हा आणण्यासाठी जावे लागत आहे. गावातील अन्य कुत्री देखील बाधित होतील, या भीतीने भटक्या कुत्र्यांना पकडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान मोतीराम बसरीकट्टी या इसमाचा देखील कुत्र्याने चावा घेतला आहे. दोन्ही पायांना त्यांना जबर जखमा झाल्या आहेत. पिसाळलेला कुत्रा काळ्यापांढऱ्या रंगाचा असून मादी जातीचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच अन्य काही कुत्र्यांचाही त्याने चावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले. एकंदरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
बंदोबस्त करण्याची तालुका पंचायतीकडे मागणी
सावगावात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांनी यापूर्वी चौघांचा चावा घेतला असून कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कुत्र्यांना पकडून त्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीकडून तालुका पंचायतीला करण्यात आली आहे. तर समुदाय आरोग्य अधिकारी मंडोळी यांच्याकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे पत्र बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीला देण्यात आले आहे.