‘लिव्ह-इन रिलेशनशिप’लाही पती हा शब्द लागू
उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण : याचिकाकर्त्याचा युक्तिवाद अमान्य
बेंगळूर : आयपीसीच्या कलम 498अ मध्ये वापरलेला ‘पती’ हा शब्द (विवाहित महिलेवर क्रूरता आणि हिंसाचार) कायदेशीररित्या वैध विवाह संबंधांपुरता मर्यादित नाही तर तो लिव्ह-इन रिलेशनशिपला देखील लागू होईल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या संदर्भात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा मुद्दा नमूद केला. आयपीसीच्या कलम 498अ अंतर्गत वापरलेला पती हा शब्द केवळ कायदेशीररित्या वैध विवाह संबंधांपुरता मर्यादित नाही. उलट, तो लिव्ह-इन रिलेशनशिपला देखील लागू आहे.
एवढेच नव्हे तर, आयपीसीचे कलम 498अ क्रूरतेच्या बाबतीत विवाहासारख्या संबंधांना देखील लागू होईल, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांच्या पीठाने याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयात तक्रार दाखल केलेल्याशी याचिकाकर्त्याचा विवाह कायदेशीररित्या अवैध आहे. त्यामुळे शिमोगा येथील रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्याच्या वकिलाने या प्रकरणात 498अ लागू होत नाही. तसेच याचिकाकर्ता आधीच विवाहित आहे. त्याला तक्रारदाराचा पती मानता येणार नाही. त्यामुळे 498अ अंतर्गत गुन्हा नोंदवू नये, अशी विनंती केली.
उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलाचा हा युक्तिवाद अमान्य केला. याचिकाकर्त्याने त्याचा पहिला विवाह लपवून तक्रारदाराशी विवाहस्वरुप संबंध ठेवले होते. त्याने यापूर्वी दुसऱ्याशी लग्न केले होते आणि त्याला एक मूल आहे. त्याने ती बाब लपवून तक्रारदाराशी विवाह करून वास्तव्य केले. तिच्या कुटुंबाकडून त्याने सोने, चांदी आणि रोख रक्कम मिळविली आहे, असा आरोप करण्यात आला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर याचिकाकर्त्याने मालमत्तेची सातत्याने मागणी केली, छळही केला आणि क्रूरपणे वागवले होते. तिचा जीव घेण्याचा प्रयत्नही केला असल्याचा आरोप आहे. अशा प्रसंगी याचिकाकर्त्याचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही. या सबबीवर कलम 498अ पासून बचाव करून घेणे शक्य नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.