इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांची पाठ
यावर्षी 33 कॉलेजमध्ये एकही प्रवेश नाही : जिल्ह्यात दोन मोठी इंजिनिअरिंग कॉलेज बंद
बेळगाव : इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाकडील विद्यार्थ्यांचा कल आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. इंजिनिअरिंगपेक्षा इतर अभ्यासक्रमांना ओढा वाढल्याने इंजिनिअरिंगकडे प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. यावर्षी 33 खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकही प्रवेश झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात अनेक इंजिनिअरिंग कॉलेज बंद होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना तारेवरची कसरत करावी लागत होती. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल इंजिनिअरिंगला असल्याने प्रवेश लवकर मिळत नव्हता. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून खासगी कॉलेजमधील व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतला जात होता. परंतु मागील काही वर्षांत इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने हा कल कमी झाला आहे.
यावर्षी राज्यातील 33 खासगी कॉलेजमध्ये एकही प्रवेश झालेला नाही. मागील वर्षी 29 कॉलेजमध्ये एकही प्रवेश झाला नव्हता. यावर्षी एकूण विद्यार्थी संख्येपैकी केवळ 80 टक्के प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. उर्वरित जागा रिक्त आहेत. खासगी इंजिनिअरिंग कॉलेज संघटनेने यासाठी परीक्षा मंडळाला जबाबदार धरले आहे. योग्यप्रकारे परीक्षांची अंमलबजावणी न केल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर्षी 79 हजार 907 जागा उपलब्ध होत्या. यापैकी 13 हजार 653 जागा अद्यापही रिक्त आहेत. इंजिनिअरिंगकडे कल कमी झाल्याने कॉलेज बंद करण्याची वेळ व्यवस्थापनावर येत आहे. बेळगाव जिल्ह्यात मागील चार वर्षांमध्ये दोन मोठी इंजिनिअरिंग कॉलेज व्यवस्थापनाला बंद करावी लागली आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी होत राहिली तर भविष्यात इतर कॉलेजही बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.