Sangli : सांगलीत शेकोटीवर राजकीय गप्पांचे वाढले तापमान !
सांगलीत निवडणुकांचा रंग
सांगली : जिल्ह्यात सध्या थंडीसोबत सर्वात जास्त तापलेली गोष्ट एकच शेकोटीवर पेटलेल्या राजकीय गप्पा! गावोगावी, वाड्यावस्त्यांवर, चावड्यांच्या अड्ड्यावर आणि चुलीजवळ बसलेल्या मंडळींच्या चर्चेचं एकच बीज-येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणुका. शेकोटी पेटली की राजकारणाची भट्टी आपोआप धगधगते. कुणी म्हणतं, "यावेळी जिल्हा परिषदमध्ये समीकरणं उलटी फिरणार!" तर दुसरा त्वरित फुकणी मारतो-अरे, अजून उमेदवार ठरलेत कुठे? आधी पक्षांतल्या घरातल्या भांडणांचा शेवट होऊ द्या!" काही गावांत तर भाकरी भाजता भाजता लोक थेट आरक्षणावर पोहोचतात.
यावेळी प्रभागबदलल्याशिवाय आपलं गणितच बसत नाही हो!" असा एकाचा स्वर. त्यावर शेजारच्या काकांचा तडकाफडकी प्रतिवाद-अहो, सगळं 'वरून' ठरतं. आपण इथं फक्त तोंडाला ऊब देतो! "नगरपंचायतीतकोण कोणाची झाडू घेणार, कोण कुणाच्या पंगतीत बसणार, कोणाच्या प्रवेशाने कोणाचे कपाळ आठ्या पडणार, या अंदाजांमुळे शेकोट्याभोवती हशा आणि रहस्य दोन्ही वाढत आहेत. काही ठिकाणी नुसते 'पक्षांतराचे धुरळे' उडताहेत. लोक म्हणतात,"अजून दोन रात्री शेकोटी पेटल्या की अर्धा तालुका नवीन पक्षातजाणार!
महापालिकेच्या चर्चाना तर वेगळाच तडका. "यावेळी सांगलीत झेंडा कोणाचा?" असा एक जण विचारतो. त्यावर लगेचउत्तर तयार- झेंडा कोणाचा हे नंतर बघू, आधी झेंडा घेऊन धावणारे किती हे ठरूद्या!" काही जणांनी तर आताच 'अंदाजपत्रक' काढलंय - कुठे त्रिकोणी लढत, कुठे घराणेशाहीचा मुद्दा, कुठे नव्याचेहऱ्याचं आकर्षण तर कुठे जुन्यांचा हट्टा खरे तर राजकीय पक्ष,नेते, कार्यकर्ते यांची पळापळ सुरू झाली आहे, पण सगळ्यातआगाऊ तयारी साधी शेकोटीवरील पंगतीची- गोष्टीची, आरोप- प्रत्यारोपाच्या फोडणीची आणि भविष्यातील सत्तेच्या ताटाची. असं म्हणतात सांगलीत निवडणुका लागेपर्यंत थंडी कमी-जास्त होईल... पण शेकोटीवरील राजकीय तापमान मात्र फुल टॉकीज जाणार हे नक्की ।