पारा घसरला.. हुडहुडी वाढली..
पारा 15 अंशावर
व्हायरल इन्फेक्शनच्या रूग्णांत वाढ
मास्क वापरण्याचा डॉक्टरांचा सल्ला
शेकोट्या भोवती रंगल्या गप्पाचे फड
कोल्हापूर
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गायब झालेल्या थंडीने नववर्षात पुनरागमन केले आहे. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात पारा चांगलाच घसरला असुन हुडहुडी वाढली आहे. रविवारी किमान तापमान 15 अंश डिग्री सेल्सिअसच्या खाली आले होते. तर कमाल तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअसवर होते.
पुढील आठवड्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. डिसेंबरच्या मध्यंतरी आलेल्या चक्रवादळामुळे ढगाळ वातावरणासह उष्मा वाढला होता. निम्म्या डिसेंबर महिन्यात थंडी ऐवजी उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागला. थंडी पूर्ण कमी झाली असे वाटत असतानाच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गुलाबी थंडीने पुन्हा आगमन केले आहे. वाढत्या थंडीमुळे ताप, सर्दी, खोकला, घशाच्या रूग्णांत वाढ होत आहे. बाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
थंडी वाढताच अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत शेकोट्या पेटू लागल्या असुन गप्पांचे फडही रंगू लागले आहेत. पहाटेपासूनच हवेत तीव्र गारठा जाणवत असुन मॉर्निंग वॉकला येणारे नागरिक हातमोजे, स्वेटर, टोपडे आदी उबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडत आहेत. सकाळी 10 वाजले तरी हुडहुडी जाणवत असुन दिवसभर आकाश निरभ्र असले तरी हवेत गारठा कायम होता. सायंकाळ नंतर गारठा वाढत असल्याने उबदार कपडे परिधान केलेले दिसत आहेत.
राज्यात उत्तरेकडील येणाऱ्या वाऱ्यामुळे चांगलाच गारठा वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तापमानात घट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु झाली असून अनेक भागात किमान तापमानात घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार असून तापमान 1 ते 3 अंशांनी खाली जाण्याची शक्यत असल्याचे भूगोल व पर्यावरण तज्ञ प्रा. युवराज मोटे यांनी सांगितले.
असे असेल पुढील आठवड्यातील तापमान
वार किमान कमाल
सोमवार : 15.0 31.0
मंगळवार : 14.0 30.0
बुधवार : 14.0 29.0
गुरूवार : 14.0 29.0
शुक्रवार : 13.0 29.0