लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण ठरलेला टेलिफोन
2 कोटी रुपये ठरली किंमत
इतिहासात काही अशा गोष्टी असतात, ज्या स्वत:मागे वेदनादायी स्मृती ठेवून जातात. तरीही अशा गोष्टींना अधिकाधिक किमतीत विकले जाते. एक अशीच गोष्ट होती एक टेलिफोन. हा फोन सामान्य नव्हता, तर यामागे अत्यंत क्रूर स्मृती दडलेल्या होत्या. प्रत्यक्षात हा हिटलरचा फोन होता, ही केवळ एक ऐतिहासिक गोष्ट नसून लाखो निर्दोष लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार देखील आहे. तरीही हा फोन एका लिलावात 2,03,27,712 रुपयांमध्ये विकला गेला आहे.
नाझी जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरशी निगडित प्रत्येक आदेशाची आठवण जपणारा हा फोन आहे. याच फोनचा वापर हिटलरने स्वत:च्या अधिकृत कार्यालया केला होता. युद्धादरम्यान स्वत:च्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी त्याने या फोनचा वापर केला होता. हा फोन ऐतिहासिक दुवा असून जो दुसऱ्या महायुद्धाच्या काळाशी निगडित आहे.
या फोनच्या मदतीने हिटलरने युद्धाच्या रणनीति स्वत:च्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविल्या आणि ज्यू, पोलिश नागरिक आणि अन्य अल्पसंख्याकांच्या हत्या करण्याचे आदेश दिले होते. याचमुळे या फोनला ‘मृत्यूचा फोन’ म्हटले जाते.
हिटलरचा फोन केवळ ऐतिहासिक नसून अनेक लोकांसाठी इतिहासाच्या एका भीतीदायक युगाची आठवण करून देणारा आहे. परंतु हा फोन द्वेष आणि हत्येसाठी ओळखला जातो, तरीही लिलावात याला मोठी किंमत मिळाली आहे.