For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

साधनेच्या मधुर फळाची गोडी अनुपम असते

06:35 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
साधनेच्या मधुर फळाची गोडी अनुपम असते

अध्याय एकतिसावा

Advertisement

एकादश स्कंधाचे वैशिष्ट्या म्हणजे श्रीकृष्णांनी परम प्राप्ती होण्यासाठी ज्ञान-वैराग्य-भक्ती-मुक्ती ह्याबद्दल स्वत: विवेचन केलेले आहे. ह्या ग्रंथाची अवतरणिका म्हणजे गोषवारा नाथमहाराज देत आहेत. त्यापैकी पहिल्या चोवीस अध्यायात भगवंतांनी काय काय सांगितले आहे ते आपण बघितले.

आता पुढील अध्यायांचा गोषवारा आपण पाहू. चोविसाव्या अध्यायात प्रकृतीचे मिथ्यापण कसे आहे हे सांगून झाल्यावर मनावर असलेल्या प्रकृतीच्या प्रभावावर मात करण्यासाठी पंचवीसाव्यात भगवंत सांगतात माणसाने मन निर्विचार करावे. म्हणजे ज्याप्रमाणे जेव्हा शेतात पिक उभे नसते त्यावेळी पशु पक्षी चोर काहीही करू शकत नाहीत. त्याप्रमाणे निर्विचारी झालेल्या मनात गुणदोषांचे विचार येत नाहीत. त्यामुळे चित्तात त्यावर चिंतन होत नाही. मन आणि चित्त दोन्हीही स्वस्थ झाले की, शांती आपोआपच साधकाच्या मनात कायमची वास्तव्याला येते. सविसाव्यात स्त्राrच्या मोहापासून साधकाने कसे सावध राहिले पाहिजे हे भगवंतांनी राजा पुरुरव्याचे उदाहरण देऊन सांगितले.

Advertisement

पुरुरव्यासारखा सत्छील राजा स्त्राrच्या नादाला लागून संपूर्ण नागवला गेला तेथे इतरांचा काय पाड? साधकाने कधीही स्त्राrच्या मोहात पडू नये म्हणून भगवंतांनी हे सर्व कथानक सविस्तर सांगितले. उत्तम पिक हातात आल्यावर शेतकरी त्याच्या साठवणुकीची ज्याप्रमाणे चोख व्यवस्था करतो त्याप्रमाणे साधनेचे उत्तम फळ मिळाल्यावर ते नासून जाऊ नये म्हणून सत्ताविसाव्या अध्यायामध्ये क्रियायोग सांगितला. अशाप्रकारे संपूर्ण दक्षता घेऊन मिळवलेले साधनेचे अतिरसाळ मधुर आणि गोड फळ कसे असते ते भगवंतांनी अठ्ठाविसाव्या अध्यायात सांगितले.  मृदु, मधुर, अतिनाजूक असलेल्या साधनेच्या फळाबाबत सांगताना भगवंत म्हणाले, ह्या फळाच्या नुसत्या वासानेच ते खाणाऱ्याला  समाधान वाटते. त्याचा पहिला घास त्याने खाताच त्याला सबाह्य अभ्यंतर अशी नित्य तृप्ती लाभते. त्याची तहानभूक हरपते. तो तृप्तीतून मिळालेल्या सुखाच्या राशीवर लोळू लागतो. असा हा अठ्ठाविसावा अध्याय अत्यंत गोड आहे. ह्या साधनेच्या मधुर फळाची अनुपम गोडी चाखायची आवड ब्रह्मादिकांनासुद्धा असते म्हणून ते त्यासाठी अत्यंत आतुर झालेले असतात. नेहमी मनुष्य जिभेच्या सहाय्याने पदार्थाची चव चाखत असतो. त्यातील माधुर्य अनुभवत असतो पण ह्या साधनेच्या फळाची गोष्टच वेगळी आहे. ह्याची गोडी साधकाला जिभेच्या सहाय्याशिवाय चाखता येते. ते फळ बारीक करून त्यातील रसनिष्पत्ती करण्यासाठी त्याला दाताची गरज पडत नाही. कोणत्याही साधनाशिवाय तो स्वत:च त्याची गोडी अनुभवत असतो.

Advertisement

श्रीकृष्णाने अत्यंत आवडीने आणि कौतुकाने उद्धवासाठी हे ताट तयार केले आणि जनार्दन चरणाची माशी असलेल्या माझ्यासारख्या क्षुद्र किटकाने त्याचे सुखाने सेवन केले. असं म्हणतात की, जिथं उत्तमोत्तम पक्वान्ने तयार केली जातात तेथे मोठ्मोठ्याना प्रवेश मिळत नाही पण एखादी लहानशी माशी मात्र तेथे सुखात प्रवेश करू शकते. माझ्यासारख्या माशीइतक्या छोट्याशा जीवाला हा अनुपम प्रसाद चाखता आला हे लक्षात घेऊन असेही म्हणता येईल की, जे सगळ्यात धाकटे असतात त्यांना कृष्णरस सहजी चाखायला मिळतो. असा हा अठ्ठाविसावा अध्याय अगम्य अशा योगाचे भांडार असून गुह्यज्ञानाने परिपूर्ण असल्याने परम सुखाचे आगर आहे. ज्यांना ह्या जेवणाची गोडी चाखायला मिळाली त्यांनी ते जेवल्यानंतर जे तृप्तीचे सुखोद्गार काढले ते ऐकणाराही धन्य होतो. एकोणतिसाव्या अध्यायाचे निरुपण फार महत्त्वाचे आहे. ह्या अध्यायामध्ये सर्व भागवताच्या श्रवणाने ऐकणाऱ्याला काय काय प्राप्ती होते त्याचे साद्यंत वर्णन त्यात आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :
×

.