‘सुपर एट’चा आरंभ आज दक्षिण आफ्रिका-अमेरिका लढतीने
वृत्तसंस्था/ नॉर्थ साउंड (अँटिग्वा)
दक्षिण आफ्रिका आज बुधवारी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सुपर एट सामन्यात उत्साही अमेरिकी संघाचा सामना करणार असून त्यांचे जागतिक दर्जाचे फलंदाज यावेळी आपला पराक्रम दाखविण्यास उत्सुक असतील. कारण चारही सामन्यांमध्ये गोलंदाजांनी जोरदार कामगिरी केल्याने दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला आहे.
न्यूयॉर्कच्या आव्हानात्मक खेळपट्टीवरील तीन सामन्यांत आणि किंग्सटाउन येथील एका सामन्यात एकदाही 120 धावांचा टप्पा दक्षिण आफ्रिकेने ओलांडला नाही. त्यांची फलंदाजीतील कामगिरी क्विंटन डी कॉक, हेन्रिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलरसारखे काही मोठे हिटर असलेल्या संघास शोभणारी नाही. त्यामुळे डी कॉक, रीझ हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्करम यांचा समावेश असलेल्या वरच्या फळीवर चांगली कामगिरी करून दाखविण्याचे दडपण जाणवू शकते.
दक्षिण आफ्रिका त्यांच्या मागील सामन्यात नेपाळविऊद्ध एका धावेने बचावला आणि गतविजेते इंग्लंड, यजमान वेस्ट इंडिज यांच्यासारख्या संघाचा समावेश असल्याकारणाने गट-2 मध्ये अमेरिकेविरुद्ध त्यांना हार पत्करून चालणार नाही. त्यामुळे त्यांना ‘सुपर एट’ची सुऊवात विजयाने करावी लागणार आहे. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेची सर्वांत मोठी चिंता एन्रिक नॉर्टजेचा खराब फॉर्म ही राहिली होती. परंतु या स्टार वेगवान गोलंदाजाने गटस्तरावर चमकदार प्रदर्शनासह ते चित्र बदलले आहे आणि सध्या नऊ बळींसह तो संयुक्तपणे दुसरा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
नॉर्टजे आणि सहकारी वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमन यांनी एक मजबूत जोडी तयार केली आहे. जोडीला मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा देखील अमेरिकेच्या फलंदाजांना हैराण करण्यास सज्ज असतील. अमेरिकी संघात आठ भारतीय, दोन पाकिस्तानी, एक वेस्ट इंडिज, एक न्यूझीलंड, एक दक्षिण आफ्रिकी आणि एक डच खेळाडू असे मिश्रण आहे. पदार्पणातच त्यांनी ‘सुपर एट’साठी पात्र ठरण्याची कामगिरी करताना आक्रमक खेळ केलेला आहे. संघ व्यवस्थापनाचे कर्णधार मोनांक पटेलच्या तंदुऊस्तीवर लक्ष राहील. तो भारताविऊद्ध आणि आयर्लंडविऊद्धही खेळू शकला नव्हता.
साखळी फेरीत माजी विजेत्या पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आणखी एक धक्का देण्यास अमेरिका उत्सुक असेल हे एक कठीण काम असले, तरी उत्साही अमेरिका आव्हानासाठी सज्ज आहे. ‘सुपर एटमधील आव्हानाची नक्कीच आम्ही वाट पाहत आहोत. गेल्या काही आठवड्यांत आम्ही हे दाखवून दिले आहे की, आम्ही काही पूर्ण सदस्य राष्ट्रांशी स्पर्धा करू शकतो आणि त्यांना हरवू शकतो’, असे अमेरिकेचा उपकर्णधार एरॉन जोन्स गेल्या आठवड्यात म्हणाला होता.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री 8 वा.