For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उन्हाळ्याचा पावसाळा होईल, कालमान बदलल!

10:52 AM May 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
उन्हाळ्याचा पावसाळा होईल  कालमान बदलल
Advertisement

निपाणीत हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त भाकणूक : कृष्णात डोणे महाराज यांनी केले कथन, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Advertisement

निपाणी : सूर्य देव तापलाय, उष्णतेच्या लाटा वाढत राहतील, नदीबाईला कुलूप लागल, नदी-तलाव कोरडे पडतील, आटून जातील. नदीपात्रे ओस पडतील. सूर्यदेव तळपतच राहील. दुष्काळ पडल. महागाई वाढत जाईल, सर्वसामान्यांना जगण मुश्कील होईल. गर्वाण वागू नका, करशीला चाकरी तर खाशिला भाकरी. शिवाजी महाराजांचा जयजयकार करा. तिरंगा झेंडा मोठ्या आनंदात राहील. निपाणीच हालसिद्धनाथ क्षेत्र प्रति आप्पाचीवाडी होईल, पाऊसकाळ पीकपाणी कालमान बदलत जाईल, उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल, अशी हालसिद्धनाथांची भाकणूक कृष्णात डोणे महाराज-वाघापूर यांनी केली. श्रीपेवाडी, पडलिहाळ, लखनापूर, जत्राट,निपाणी अशा पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अकोळ रोडवरील हालसिद्धनाथ देवाची यात्रा रविवारी उत्साहात पार पडली. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सकाळी होम पूजाविधी, पालखी मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. बळीराम पुजारी, मारुती बरगाले, अजित गावडे यांनी हेडाम खेळविले. यानंतर हालसिद्धनाथांची भाकणूक झाली.

दीड महिन्याचे पीक येईल

Advertisement

पिवळ्या भस्माचा अघाद वाढत राहील, हालसिद्धनाथ वाघापुरे पुजाऱ्याच्या अंगात संचार घेतलाया, भविष्यवाणी कथन करतोया, माजी विटंबणा, निंदा करशीला तर मातीत मिसळून जाशिला. सासणेच्या बाळाशी आशीर्वाद हायं, खरीप पीक उदंड पिकलं, जमिनीतील धान्य अधिक पिकलं, तांबडी रास मध्यम पिकल, काळ धान्य सफल होईल, पांढर धान्य मध्यम पिकल आणि मोलान विकल. घवाच्या पिकाचे नुकसान होईल. हातात भाकरी खांद्यावर चाबूक, साधल तोच साधल, सरता मिरग निघालाय, मध्यम पेरा होईल अल्लम दुनियेचा पेरा होईल, कुरी थाऱ्याला बसल, रोहिणीची पेरणी त्याला हातग्याची पुरवणी दीड महिन्याच पीक येईल.

वैरण सोन्याची होईल,मोलानं विकल

ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल, धान्य दारात वैरण कोपऱ्यात राहील, वैरण-धान्याच्या चोऱ्या होतील, सांभाळून ठेवा, वैरण सोन्याची होईल, मोलान विकल. मेंढीच बाळ पालखीतून मिरवल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, बकऱ्याचा भाव 1 लाखावर जाईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. धनगराच पोरगं मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल, सांभाळून खा, मेंढीच्या मेंढ्याला माझा आशीर्वाद हाय, मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल.

गुळाचा भाव तेजीत राहील,उच्चांक गाठल

रसायन भांड उदंड पिकलं, रसाला धारण माणसाला मरण येईल, उसाचा काऊस होईल सडकवर पडलं, साखरेचा भाग तेजी-मंदीत राहील, चढल-उतरल, गुळाचा भाव तेजीत राहिल, उच्चांक गाठल, शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील, साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, उसाच्या कांड्यान आणि दुधाच्या भांड्यान आंदोलन पेटतील, शेतकरीवर्ग चिंतेत राहील, तंबाखूची पेंडी मध्यम पिकलं, मोलान विकलं, तंबाखूचा बंबाखू होईल, तंबाखूचा भाव गगनाला भिडल. काही दिवस कमी-जास्त राहील.

कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल

कळपातला बकरा कळपात लढल, लढून खेळल, दुनिया पेटल, काळरात्र येईल. गायीच वासरु गायीला ओळखणार नाही, गाय आणि वासरू भेटणार नाही. घरातून गेलेला माणूस परत येईल अशी आशा बाळगू नका, ठेचला मरण हाय, माणसाला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील, माझ माझ म्हणू नका, हा सारा मायेचा बाजार हाय, पाण्यावरचा बुडबुडा हाय, पाण्याचा कप विकत मिळलं, पाळी लागल. अठरा तऱ्हेच आजार मनुष्याला होतील, डॉक्टर लोक हात टेकतील. आड चुकल पण खेडं चुकणार नाही. कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल, विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल, विज्ञानाची प्रगती माणसाचा घात करल, दागदागिने, पैसे माणसाला घातक ठरतील, दिवसाढवळ्dया डाकू दरोडा टाकतील, रेल्वेमोटारीचा मोठा अपघात होईल, कोल्हापूरच्या देवीला मोठ संकट पडलया, रात्री 12 ला तिच्या नेत्रातून पाणी पडतया.

भारत-पाकिस्तान गुप्त युद्ध सुरूच राहील

बसव्याच शिंगाट सोन्याच होईल, बसव्या पालखीतून मिरवल, एक औत चौघात होईल. शेतीचा भाव गगनाला भिडल, पैशाच्या जोरावर माणसाला न्याय मिळल. न्यायदेवता विकत मिळतं. चैत्राच्या महिन्यात गायी माळावर जातील, श्रावण महिन्यात गायी गंगेला जातील. कर्नाटकाच्या जलाशयाला मोठ भगदाड पडल, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न लवकरच सुटल. निपाणी भागाच भविष्य मोठ हाय, सीमाभागात मोठा गोंधळ होईल, अतिरेकी येतील घोटाळा करतील, बॉम्बस्फोट होतील, शहराला लागून शहर उद्ध्वस्त होतील, जगाचा चौथाई कोणा ओसाड पडल, भारत-पाकिस्तान गुप्त युद्ध होईल, भारतीय सैन्य लढत राहतील, भारत मातेचा जयजयकार करतील.

राजकीय नेते विकत मिळतील

राजकारणात मोठा गोंधळ होईल, राजकीय हल्ले वाढतील, नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील, सता संपतीच्या मागे लागतील, भांडून खेळतील, राजकारणात राजकीय नेते विकत मिळतील. राजकारणात पैसा खाणारा माणूस शोधून सापडणार नाही, राजकीय नेते मोठ्या घोटाळ्dयात अडकून पडतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसलं. कर्नाटकात एका पक्षात गट पडतील, सीमाभागातलं राजकारण ढवळून जाईल, निपाणीचे भागाचे भविष्य मोठे हायं.

नदीजोड प्रकल्प येतील

कलियुगाचा खांब डळमळतोय, मोठं पाप होतयं, बहीण-भावाच्या नात्याला कलंक लागलं, भावाला बहीण ओळखेना, सासऱ्याला सुन ओळखेना, डेंगराएवढं पाप, दोऱ्याएवढं पुण्य राहीलया, 9 वर्षाची मुलगी भरतार मागलं, 16 व्या वर्षी मुलगी आई होईलं, माणसाची बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील, 35 वर्षाचं म्हातारपण येईल, अशी भाकणूक कथन केली.

Advertisement
Tags :

.