For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाणबुडी प्रकल्प होतोय, सी-वर्ल्ड प्रकल्पाचं काय?

06:13 AM Dec 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाणबुडी प्रकल्प होतोय  सी वर्ल्ड प्रकल्पाचं काय
Advertisement

केंद्र सरकारने कोकणच्या सागरी पर्यटनासाठी अंडर वॉटर म्युझियम अर्थात पाणबुडी प्रकल्पासाठी 48 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे निश्चितच कोकणच्या सागरी पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सी-वर्ल्ड प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास साडेसहा हजार कोटींचा प्रकल्प मालवणच्या किनाऱ्यावर, तेंडवळी-वायंगणी येथे उभारण्यात येणार होता मात्र हा प्रकल्प निधी न मिळाल्याने पुढे सरकलेलाच नाही.

Advertisement

कोकणात वेंगुर्ले समुद्र किनारी होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत गेल्या दोन-तीन वर्षांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर या प्रकल्पासाठी आग्रही राहून त्यांनी कोकणात पाणबुडी प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. निधी मंजूर नव्हता. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला, असा विरोधी आमदारांनी आरोपही केला. त्यामुळे कोकणातील पर्यटन विकासात भर घालणारा पाणबुडी प्रकल्प व्हावा, अशी पुन्हा मागणी सुरू होत होती. अखेर केंद्र सरकारने कोकणच्या सागरी पर्यटनासाठी अंडर वॉटर म्युझियम अर्थात पाणबुडी प्रकल्पांसाठी 48 कोटीचा निधी मंजूर केला. त्यामुळे कोकणच्या सागरी पर्यटनात मोठी भर पडणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

समुद्राखालचे जग पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, लहान मुले व वयोवृद्धांना समुद्राखालचे जग पाहण्याचा आनंद लुटता येत नाही. याचाच विचार करून 2019 मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी अर्थ खात्याचे राज्यमंत्री असताना हा प्रकल्प शासनास सादर केला होता. त्यासाठी सरकारची मान्यता व निधीही मंजूर झाला होता. मात्र, त्यानंतर राज्यात सरकार बदलल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळू शकली नाही. उलट हा प्रकल्प गुजारातला वळविला जाण्याची शक्यता निर्माण झाली आणि विरोधकांनी प्रकल्प गुजरातला पळविल्याचा आरोप करत रान पेटविले होते. त्यामुळे कोकणातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प गाजला होता.

Advertisement

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बहुचर्चित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाणबुडी आर्टिफिशियल रिफ अंडर वॉटर म्युझियम प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच तोही वेंगुर्ले-मालवण दरम्यान समुद्रात होणार, यावर आता पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट असून तो प्रकल्प प्रत्यक्षात लवकरच साकार होईल. त्यामुळे वेंगुर्ले ते मालवणपर्यंतच्या समुद्रात पर्यटन विकासाच्या अनेक शाखा विस्तारल्या जाणार आहेत.

महत्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. अमेरिका, युरोप आदी प्रगत देशांमधील प्रकल्पांचा बारकाव्याने अभ्यास करून पाणबुडी केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. पर्यटकांना त्यामुळे समुद्राच्या अंतरंगातील जग प्रत्यक्ष समुद्रात जाऊन पाहता येणार आहे. सर्वच वयोगटातील पर्यटकांना याचा आनंद लुटता येणार आहे. वेंगुर्ले बंदर येथे याचे केंद्र निर्माण केले जाणार आहे व पाणबुडीद्वारे पर्यटकांना समुद्राच्या अंतरंगाची सफर केली जाणार आहे.

समुद्राच्या अंतरंगातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सखोल संशोधनाअंती जगातील प्रगत देशाच्या धर्तीवर सबमरीन अंडरवॉटर म्युझियम प्रकल्प विकसित केला जाणार आहे. यासाठी नौदलाच्या विना वापर युद्धनौकेचा वापर केला जाणार आहे. ही युद्धनौका मुंबई येथील डॉकयार्डमध्ये आणण्यात आली आहे. तेथे ती कृत्रिम प्रवाळ निर्मितीसाठी मॉडीफाय केली जात आहे. बोटीतील सर्व प्रदूषणकारी घटक काढून ती समुद्रात बुडविण्यासाठी सज्ज केली जाणार आहे. ही युद्धनौका वेंगुर्ले व मालवण यांना मध्यवर्ती असलेल्या निवती रॉक भागातील समुद्रात बुडविली जाणार आहे. या बोटीवर काही दिवसांतच कृत्रिम प्रवाळे विकसित होतील. समुद्रातील विविध प्रकारचे मासे व जीवजंतू या प्रवाळांकडे आकर्षित होतील. त्यामुळे ही युद्धनौका म्हणजे विशालकाय समुद्रातील अंतरंग उलगडणारे ठिकाण असणारे अंडर वॉटर म्युझियम बनणार आहे. पाणबुडीद्वारे या म्युझियमची सफर केली जाणार आहे.

पाणबुडी प्रकल्प होतोय, सी-वर्ल्डचं काय?

पाणबुडी प्रकल्पाला केंद्र सरकारकडून 47 कोटीचा निधी मंजूर झाल्याने हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. त्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे, याबद्दल कोणाचं दुमत नाही. या प्रकल्पाचे सर्वांकडून स्वागतच केले जात आहे. त्याबरोबरच जागतिक दर्जाच्या पर्यटनाची क्षमता असलेल्या व गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला सी-वर्ल्ड प्रकल्प होणार, की गाशा गुंडाळला गेलाय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोकणात पर्यटन वाढीसाठी सी-वर्ल्ड प्रकल्प उभारणीची घोषणा दहा वर्षांपूर्वी केली होती. मात्र, मालवण तालुक्यातील तोंडवळी-वायंगणी येथील हा प्रकल्प गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी केंद्र व राज्य सरकार या दोघांकडूनही न मिळाल्याने आणि स्थानिक लोकांचा सुऊवातीला थोडा विरोध झाल्याने हा प्रकल्प पुढे सरकलाच नाही. हा विरोध आता थोडा मावळलेला असताना कोणी या प्रकल्पाबाबत बोलत नाही. मावळत्या सरकारमध्येही सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी देण्याची घोषणा झाली पण पुढे काहीच झाले नाही.

सिंधुदुर्ग हा 1997 मध्ये पर्यटन जिल्हा घोषित झाला. यावेळी टाटा कन्सल्टन्सी या संस्थेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील 35 पर्यटन क्षेत्रे जागतिक पर्यटन क्षेत्रे म्हणून निश्चित करण्यात आली होती. मात्र, या पर्यटन केंद्रांना आवश्यक त्या सुविधा देण्याचे काम पुढे सरकलेले नाही. पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे प्रकल्पही पूर्णत्वास गेलेले नाहीत. मात्र, आता पाणबुडी प्रकल्पानंतर सी-वर्ल्ड प्रकल्प व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मालवण तालुक्यात होणारा सी-वर्ल्ड प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास तो देशातील पहिला आणि आशिया खंडातील सहावा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पात जगातील पहिले समुद्र थीमवर आधारित शहर, दुर्गम भागात जमिनीवर होणारा हा पहिलाच प्रकल्प. यात पायाभूत रस्ते, वीज, सांडपाणी निचरा, बगीचे, पाण्याचे तळे, कृत्रिम नद्या, शॉपिंग मार्केट, मोठी पार्किंग व्यवस्था, आयकॉनिक किनारे, अम्युझमेंट पार्क, दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, स्थानिकांना एकूण जागेच्या दहा ते पंधरा टक्के जागा राखीव, सडेवाडी येथील जंगलाचे संवर्धन-संरक्षण, समुद्री जीवांचा बचाव आणि उपचारांसाठी अद्ययावत असे केंद्र, सडेवाडी जवळ फिशिंग वार्फ अर्थात मच्छीमार गाव अशी संकल्पना होती. परंतु निधीअभावी व स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे, असे म्हटले जाते.

तोंडवळी-वायंगणी येथील स्थानिक ग्रामस्थांचा सी-वर्ल्ड प्रकल्पाला होणारा विरोध आता मावळला आहे. त्यांनाही हा प्रकल्प पर्यटन वाढीतून आर्थिक समृद्धीसाठी हवाच आहे. परंतु स्थानिकांना विस्थापित करू नये आणि 1390 एकर क्षेत्राऐवजी 300 ते 350 एकर एवढ्या कमी जागेत व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. या मागण्यांबाबत विद्यमान सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढल्यास सी-वर्ल्ड प्रकल्प पुढे सरकू शकतो.

सध्याची राजकीय स्थिती पाहता, केंद्र व राज्यात भाजप महायुतीचे सरकार आहे. कोकणातील खासदार व आमदार महायुतीचेच आहेत. त्यामुळे विरोध करणारे कोणी नाही. केवळ पुन्हा एकदा हा प्रकल्प होण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरल्यास व प्रकल्प होण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यास सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्यात यश येऊ शकते आणि रखडलेला हा प्रकल्प झाल्यास कोकणचा पर्यटन दृष्ट्या कायापालट होऊ शकतो व आर्थिक समृद्धी येऊ शकते.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.