रजपूतवाडी थांब्यावर विद्यार्थिनींना बसमध्ये चढण्यास अटकाव! विद्यार्थिनींतून तीव्र संताप
प्रयाग चिखली वार्ताहर
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रजपुतवाडी फाट्यावर बस थांबा असून देखील महामंडळाच्या एस टी गाड्या थांबत नसल्यामुळे विशेष करून विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय होत आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता या रूठ वरील मसूद माले येथून येणाऱ्या बस गाडीच्या(क्रमांक. एम एच ०७ सी ९२०८) चालकाने गाडी थांबवली मात्र स्टॉप वर अर्ध्या तासापासून उभ्या असलेल्या 25 ते 30 विद्यार्थिनींना बस मध्ये चढण्यासाठी अटकाव करत गाडी पुढे हाकली. वास्तविक यावेळी गाडी बहुतांशी मोकळीच होती. त्यामुळे गैरसोय झालेल्या विद्यार्थिनींनी एसटी प्रशासना बाबत तीव्र संताप व्यक्त करत संबंधित कर्तव्यात कसूर करणारे मग्रूर चालक (बिल्ला क्रमांक ४७३३) वाहक(बिल्ला क्रमांक २८०८०) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान असा अनुभव रोजचाच असल्यामुळे येथील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिला नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे याबाबत एसटी प्रशासनाने लक्ष घालून नाठाळ आणि मग्रूर चालक वाहकांवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामपंचायतीने एका ठरावाद्वारे एसटी महामंडळाकडे आजच केली आहे.
सरकारकडून एसटी महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्या साठी विविध योजना राबवल्या जात असताना रजपुतवाडी येथील विद्यार्थिनी बाबत रोजच्याच अनुभवामुळे नाठाळ कर्मचाऱ्यांच्या मग्रूरी चे होत असल्याची चर्चा चालू आहे