506 दूध संस्थांची नोंदणी रद्द
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जिह्यातील ज्या सहकारी दूध संस्था बंद आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून निवडणूक प्रक्रिया अथवा लेखापरिक्षण झालेले नाही, अशा 741 दुध संस्था अवसायनात काढल्या असून त्यापैकी 506 संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. केवळ ठरावाच्या राजकारणासाठी काढलेल्या या संस्थांवर सहाय्यक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी ही कारवाई केली आहे. तर बंदीस्त शेळी, मेंढी पालन व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांमधील 776 संस्था अवसायनात निघाल्या असून त्यापैकी 740 संस्थांची नोंदणी रद्द केली आहे.
अमृततुल्य मानल्या जाणाऱ्या दूधामध्येही राजकारण शिरल्यामुळे गावागावामध्ये प्राथमिक दूधसंस्थांचे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण झाले आहे. प्रत्येक राजकीय गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी आणि स्वत:च्या फायद्यासाठी प्राथमिक दूध संस्था सुरु केल्या. पण केवळ दुध संघाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काढलेल्या अनेक संस्था आता डबघाईला आल्या आहेत. गावातील सर्वसामान्य दूध उत्पादक सभासदांचे अर्थिक हित डोळ्यासमोर कामकाज करण्याऐवजी केवळ स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी काढलेल्या संस्था अनेक वर्षांपासून बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्यांचे लेखापरीक्षण झालेले नाही. निवडणूक प्रक्रिया देखील झालेली नाही. अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहिम दुग्ध विभागाच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 741 अवसायनातील दूध संस्थांपैकी 506 संस्थांची नोंदणी थेट रद्द केली आहे.
सहकाराला सावरण्यासाठी केंद्र सरकारने 97 वी घटनादुरुस्ती करून सहकार कायद्यात अमुलाग्र बदल केला. सहकाराला स्वायत्तता देत पारदर्शकता आणण्यासाठी केलेल्या या नवीन सहकारी कायद्यामुळे सहकारामध्ये अधिकच गोंधळ निर्माण झाला आहे. या कायद्यानुसार संस्थांचे लेखापरिक्षण करण्यासाठी लेखापरिक्षक नेमण्याचे सर्वाधिकार संस्थांना दिले आहेत. त्यामुळे संस्थाचालकांकडून आपल्याच मर्जीतील लेखापरिक्षक नेमण्याबाबत ठराव केला जात आहे. ज्या लेखापरिक्षकाची लेखापरिक्षणासाठी नियुक्ती केली जाते, त्याला संस्थेतील गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी मर्यादा येत आहेत. तसेच यावर्षी संस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दाखवल्यास, पुढील वर्षाचे लेखापरिक्षण करण्यासाठी संस्थेकडून नियुक्तीचा ठराव दिला जाणार नाही. या भितीपोटी संस्थांकडून नियुक्त केलेल्या प्रमाणित व सनदी लेखापरिक्षकांकडून संस्थामधील गैरव्यवहार दडपले जाण्याची दाट शक्यता आहे. त्रयस्थ यंत्रणेमार्फत संस्थांचे लेखापरिक्षण करण्याच्या मुळ हेतुलाच नवीन सहकारी कायद्यामुळे बाधा आली असून संस्थांना अधिकार प्राप्त झाल्यामुळे लेखापरिक्षणासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे जिह्यातील अनेक संस्थांनी अनेक वर्षांपासून लेखापरिक्षण केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा दूध संस्था सहाय्यक निबंधकांनी (दुग्ध) अवसायनात काढल्या असून तेथे अवसायकांची नियुक्ती केली आहे.
- हातकणंगलेतील सर्वाधिक 94 दूध संस्थांची नोंदणी रद्द
जिह्यात नोंदणी रद्द केलेल्या 506 संस्थांपैकी हातकणंगले तालुक्यातील सर्वाधिक 94 दुध संस्थांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ शिरोळ तालुक्यातीलही 91 संस्थांचा समावेश आहे.
- नॅशनल को ऑपरेटीव्ह डाटा बेस‘मधून संस्थांची माहिती संकलित
‘केंद्र शासनाकडून ‘नॅशनल को ऑपरेटीव्ह डाटा बेस‘ या प्रणालीतून सर्व सहकारी संस्थांची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये कोणत्या संस्थेचे कामकाज सुरु आहे ? कोणत्या संस्थेची निवडणूक प्रक्रिया राबविली गेली आहे ? लेखापरिक्षण झाले आहे काय ? आदी संस्थांबाबतची सर्व माहिती शासनाने दिलेल्या प्रणालीत एकत्र करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे साहजिकच संस्थांबाबतची सर्व माहिती एकत्रित होत आहे. अजूनही काही संस्थांचे कामकाज बंद आहे, त्या संस्था लवकरच बंद केल्या जाणार आहेत.
प्रदीप मालगावे, सहाय्यक निबंधक (दुग्ध)
- नोंदणी रद्द आणि अवसायनातील दुध संस्थां (तालुकानिहाय)
तालुका अवसायनातील संस्था नोंदणी रद्द केलेल्या संस्था
आजरा 25 15
करवीर 82 51
कागल 68 55
गगनबावडा 14 05
गडहिंग्लज 38 26
चंदगड 49 30
पन्हाळा 50 27
भुदरगड 56 32
राधानगरी 80 50
शाहूवाडी 72 30
शिरोळ 98 91
हातकणंगले 109 94
एकूण 741 506