सर्वात विचित्र वाद्य
थेरेमिन जगातील सर्वात विचित्र वाद्य असुन याचा आविष्कार 1919 मध्ये रशियन भौतिकशास्त्रज्ञ लेव सर्गेयेविच टर्मेन किंवा लियोन थेरेमिन यांनी केला होता. याला ईथरफोन, थेरेमिनोफोन किंवा टर्मेनवॉक्स या नावाने ओळख्घ्ले जात होते. टर्मेन हे अमेरिकेत दुहेरी जीवन जगत होते, तेव्हा रशियन हेरयंत्रणा केजीबीचे ते हस्तक होते. त्यांनी निर्माण केलेल्या सांगितिक वाद्याचे वैशिष्ट्या जाणून घेतल्यावर चकित व्हायला होते. थेरेमिन जगातील आतापर्यंतचे सर्वात अजब आणि भीतीदायक संगीत वाद्य आहे. यात कुठलीच चावी, कुठलीच तार नाही, केवळ दोन धातूच्या छडी असून त्यांना तुम्ही स्पर्श देखील करत नाही, केवळ या वाद्याच्या चहुबाजूला हवेत स्वत:चे हात फिरविता आणि एका ओपेरा गायकाप्रमाणे एक कापणारा आवाज त्यातून निघतो. टर्मेन यांनी या वाद्याचा आविष्कार योगायोगातून केला होता. प्रत्यक्षात ते अन्य प्रकल्पावर काम करत होते. परंतु एक वर्षात टर्मेन यांनी पहिल्या सार्वजनिक संगीत सोहळ्यासाठी स्वत:च्या वाद्यात पुरेसे प्राविण्य मिळविले होते, त्यांनी मूळ स्वरुपात याला ‘ईथरफोन’ नाव दिले होते. नंतर याला सोव्हिएत संघात टर्मेनवॉक्स आणि अमेरिकेत थेरेमिन या नावाने ओळखले गेले.
अमेरिकेत कसे पोहोचले टर्मेन
ब्लादिमीर लेनिन हे त्या काळात रशियाच्या नव्या बोल्शेविक सरकारचे प्रमुख होते, त्यांच्यासोबत टर्मेन यांची एक बैठक झाली होती, यानंतर टर्मेन यांना देशाच्या विद्युतीकरणाला चालना देण्यासाठी पूर्ण रशियात पाठविण्यात आले होते. ते जेथे कुठे गेले तेथे मोठी गर्दी जमा व्हायची. यानंतर लेनिन यांनी रशियाच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी युरोप आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर टर्मेन यांना पाठविले हेते. तेथे त्यांच्या प्रदर्शनाचे प्रचंड कौतुक झाले होते. टर्मेन हे थेरेमिन वाजवायचे तेव्हा याला त्या काळात जादू मानले जात होते.
अमेरिकेत सुरू केला व्यवसाय
टर्मेन यांनी एक वाणिज्यिक विक्रेते म्हणून या वाद्याच्या निर्मितीसाठी रेडिओ कॉर्पोरेशन ऑफ अमेरिकेसोबत करार केला होता. हे वाद्य वाजविणे सोपे नव्हते, यामुळे हा करार कोलमडला होता. आरसीए ही अमेरिकेतील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स निर्माती होती. टर्मेन यांनी स्वत:ची कंपनीही चालवून पाहिली होती. त्यांनी अमेरिकन महिला लाविनिया विलियम्ससोबत विवाह केला होता. परंतु स्थिती बिघडल्यावर ते पत्नीला सोडून सोव्हियत महासंघात परतले होते.
थेरेमिनचे अनोखे वैशिष्ट्या
थेरेमिन एक इलेक्ट्रॉनिक संगीत वाद्य असून ते हातांच्या स्पर्शाशिवाय वाजविले जाते. हेच या उपकरणाचे सर्वात अनोखे वैशिष्ट्या आहे. याला वाजविणाऱ्या कलाकाराला थेरेमिनिस्ट म्हटले जाते. तो पिच आणि व्हॉल्यूमला नियंत्रित करण्यासाठी वाद्याच्या दोन एंटेनाद्वारे निर्माण करण्यात आलेल्या विद्युत चुंबकीय क्षेत्रांमध्ये स्वत:चे हात फिरवितो आणि यातून ध्वनी निर्माण होतो. हे वाद्य वाजविणे अत्यंत कठिण आहे.