हरवलेल्या सापाची गोष्ट
गारुडी किंवा सर्पप्रेमी वगळता अन्य कोणीही आपल्या घरात साप पाळत असल्याची शक्यता जवळपास दुरापास्तच आहे. मात्र, ब्रिटनच्या डरहॅम भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने घरात साप पाळला आहे. तो विषारी नाही. पण भीतीदायक निश्चितच आहे. मालकाने कौतुकाने त्याचे नाव एन्गस असे ठेवले असून तो कॉर्न या जातीचा आहे. तो घरात चांगलाच रुळला आहे.
तथापि, एक वर्षभरापूर्वी हा साप अचानक घरातून पळून गेला. त्याला शोधण्याचे प्रयत्न मालकाने केले. तथापि, तो सापडला नाही. पोलिसात तक्रारही देण्यात आली. पण सापाला शोधण्यात बऱ्याच अडचणी होत्या. हरविलेला माणूस शोधणे त्यामानाने सोपे असते. पण सापासाठी काय करणार ? असा विचार करुन मालकानेही त्याला शोधण्याचा नाद सोडून दिला. साप विषारी नसल्याने त्याच्यापासून कोणा माणसाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नव्हती.
पण आश्चर्याची बाब अशी की, तब्बल एक वर्षाने हा साप पुन्हा घरी परत आला. घराच्या आसपास तो असताना मालकाला तो दिसला आणि त्याने त्याला पुन्हा घरात आणले. सापही जणू काही झालेलेच नाही, अशा प्रकारे पुन्हा घरात राहू लागला आहे. या प्रकाराने सर्पतज्ञही बुचकळ्यात पडले आहेत. हा साप एक वर्षभर जिवंत कसा राहिला ? त्याच्या खाण्याची सोय कशी झाली ? त्याला कोणी मारले कसे नाही ? किंवा कोणाच्या तो दृष्टीस पडून त्याने प्रशासनाला कसे कळविले नाही ? असे अनेक प्रश्न सध्या या सापाने निर्माण केले आहेत. ब्रिटनमध्ये प्रचंड थंडी असते. अशा थंडीत कोणत्याही संरक्षणाशिवाय पाळीव प्राणी जिवंत राहणे जवळपास अशक्य मानले जाते. पण हा साप अपवाद ठरला आहे.
असे घडले कसे ? हाच सध्या या भागात चर्चेचा विषय बनलेला आहे. साप हरविण्याची बाब फारशी आश्चर्यकारक नव्हती. पण मालकाच्या संरक्षणाशिवाय तो एक वर्षभर जिवंत राहणे ही बाब आजवरच्या सर्व समजुतींना तडा देणारी ठरली आहे. या घटनेने प्राणीतज्ञांसमोर काही प्रश्न उभे केले आहेत, हे मात्र खरे.