For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कथा निवडणूक चिन्हांची...

06:29 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
कथा निवडणूक चिन्हांची
Advertisement

? भारतातील लोकसभा निवडणुकीपासून ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत सर्वत्र ‘निवडणूक चिन्हा’ला अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी सुशिक्षित मतदारही आपले मत उमेदवारला किंवा पक्षाला नव्हे, तर ‘चिन्हा’ला देत असतात. मतदान केंद्रात गेल्यानंतर मतदान यंत्रावर उमेदवाराचे नाव शोधण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. आपल्याला हवे ते चिन्ह असलेले बटण दाबले की झाले काम.

Advertisement

? हे चिन्ह प्रकरण आपल्याकडे स्वातंत्र्य पूर्व काळातही काही प्रमाणात होते. पण त्याची खरी आवश्यकता स्वतंत्र भारताच्या प्रथम सार्वत्रिक निवडणुकीत प्रकर्षाने भासली. ही निवडणूक 1952 मध्ये झाली. त्यावेळी भारतात साक्षरतेचे प्रमाण अवघे 25 टक्के होते. त्यामुळे बहुसंख्य मतदारांना उमेदवारांचे नाव वाचता येत नव्हते ही स्थिती होती. पण मतदानाचा अधिकार तर सर्वांना होता.

? यावर त्यावेळच्या निवडणूक आयोगाने ‘चिन्ह’ हा तोडगा काढला. प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक उमेदवाराला लोकांना परिचित असणाऱ्या वस्तू, किंवा प्राणी यांची चित्रे चिन्ह म्हणून देण्याचा निर्णय झाला. हे चिन्ह निरक्षर मतदारही लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे मतदान प्रक्रिया सोपी होणार होती. तेव्हापासून हे चिन्ह जे भारतीय निवडणुकांना चिकटले ते कायमचेच. ते कधीही जाणार नाही.

Advertisement

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या चिन्हांची कथा

? भारतात किमान 188 पक्ष आहेत. तथापि, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हेच दोन पक्ष खऱ्या अर्थांनी राष्ट्रीय आणि राष्टव्यापी आहेत. त्यांच्या चिन्हांना एक ऐतिहासीक महत्व आहे. या पक्षांच्या इतिहासाप्रमाणेच ही चिन्हेही परिवर्तीत होत गेली आहेत. सर्वात जास्तवेळा काँग्रेसचे चिन्ह बदललेले आहे.

असे बदलत गेले काँग्रेसचे चिन्ह

? 1952 ते 1969 या काळात काँग्रेसचे चिन्ह ‘जू ला बांधलेले दोन बैल’ असे होते. या चिन्हावर काँग्रेसने सलग चार लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या. 1969 मध्ये काँग्रेसमध्ये प्रथम फूट पडली. इंदिरा गांधींनी त्यांचा काँग्रेस रिक्विझिशनिस्ट (काँग्रेस आर) हा गट, ज्याला बहुसंख्य खासदारांचा पाठिंबा होता, त्याची स्थापना केली. त्याला निवडणूक आयोगाने ‘गायीचे दूध शोषणारे वासरु’ किंवा गायवासरु हे चिन्ह दिले. तर उरलेल्या गटाला पूर्वीचेच चिन्ह मिळाले.

? गायवासरु हे चिन्ह जनमानसात इतके बिंबले की दोन बैल हे चिन्ह लोक विसरुनच गेले. प्रारंभापासून गायवासरु हेच काँग्रेसचे चिन्ह आहे, अशी समजूत अनेकांची होती. या चिन्हावर इंदिरा गांधींनी 1971 ची निवडणूक जिंकली. 1977 मध्ये याच चिन्हावर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली. या फुटीनंतर इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाला सध्याचे ‘हात’ हे चिन्ह मिळाले आहे. 1978 पासून काँग्रेस याच चिन्हावर लढत आहे.

एकदाच बदलले भाजपचे चिन्ह

? डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीं, डॉ. बलराज मधोक आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी 21 ऑक्टोबर 1951 या दिवशी ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली. या पक्षाला ‘तेवत असणारा दीप’ हे चिन्ह मिळाले होते. या पक्षाने 1951-1952 ची लोकसभा निवडणूक याच चिन्हावर लढली होती. तेव्हापासून 1977 पर्यंत जनसंघाने प्रत्येक लोकसभा किंवा इतर कोणतीही निवडणूक याच ‘तेवत असणारा दीप’ किंवा ‘तेवता दिवा’ याच चिन्हावर लढविली होती.

? 1977  लोकसभा निवडणुकीपूर्वी 23 जानेवारी 1977 या दिवशी भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल, प्रजासमाजवादी आणि संघटना काँग्रेस या चार पक्षांनी एकत्र येत ‘जनता पक्ष’ या नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षात हे सर्व पक्ष विलीन झाले होते. या नव्या पक्षाला तत्कालीन निवडणूक आयोगाने ‘नांगरधारी शेतकरी’ असे चिन्ह दिले. पण पुढे जनसंघाचे नेते या पक्षातून बाहेर पडले. त्यांनी 6 एप्रिल 1980 या दिवशी ‘भारतीय जनता पक्ष’ या नव्या पक्षाची स्थापना केली.

? या नव्या पक्षाची स्थापना ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती. वाजपेयी पुढे देशाचे पंतप्रधानही झाले. तर लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. या नव्या पक्षाला तत्कालीन निवडणूक आयोगाने ‘कमल’ किंवा मराठीत कमळ हे चिन्ह दिले. तेव्हापासून तेच भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असून, गेली 44 वर्षे हा पक्ष त्यावर निवडणूक लढवीत आहे.

दोन बैल, गायवासरु, दिवा, नांगरधारी शेतकरी यांचे काय झाले...

? ही सर्व चिन्हे निवडणूक आयोगाने गोठविलेली असून त्यांचा उपयोग कोणत्याही पक्षाला करता येत नाही. अपक्षांनाही त्यांच्यापैकी कोणतेही चिन्ह दिले जाऊ शकत नाही. जनता पक्षाचे अस्तित्व होते तो पर्यंत त्याचे मूळ चिन्ह त्याच्याकडे होते. पण आता जनता पक्ष, संघटना काँग्रेस, प्रजासमावादी पक्ष आदी पक्षांची स्थिती नामशेष झाल्याप्रमाणे आहे. त्यामुळे चिन्हेही गोठविली आहेत.

Advertisement
Tags :

.