पायऱ्यांप्रमाणे वापरले जाणारे दगड ठरले प्राचीन ठेवा
डायनासोरच्या पाऊलखुणांनी होते युक्त
चीनच्या सिचुआन प्रांतात राहणारे दोन भाऊ मागील 20 वर्षांपासून ज्या चपट्या आकाराच्या दगडांचा वापर स्वत:च्या घराबाहेर पायऱ्यांप्रमाणे वापर करत होते, ते प्रत्यक्षात 19 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरच्या पाऊलखुणांनी युक्त निघाले. डिंग नावाच्या भावांना हे दगड 1998 मध्ये मिळाले होते. यावर कोंबडीच्या पावलांच्या खुणा असल्याचे त्यांना वाटले होते, याचमुळे ते या दगडांचा स्वत:च्या घराबाहेर पायऱ्यांप्रमाणे वापर करत होते. 2017 मध्ये दोन भावांपैकी एकाच्या मुलीने याची छायाचित्रे इंटरनेटवर शेअर केली आणि ही छायाचित्रे पाहताच जिगोंग डायनासोर म्युझियमचे वैज्ञानिक चकित झाले, कारण या खऱ्या डायनासोर पाऊलखुणा होत्या.
वैज्ञानिकांना काय आढळले?
संशोधकांनी या दगडांचे अध्ययन केले. यावर एकूण 413 डायनासोरांच्या पायांच्या खुणा होत्या. हे डायनासोर 18-19 कोटी वर्षांपूर्वीचे होते. बहुतांश खुणा दोन प्रकारच्या थेरोपोड डायनसोरच्या होत्या, यात ग्रॅल्लेटोर आणि इयुब्रॉन्टेस सामील होते. हे डायनासोर 6-9 किमी प्रतितासाच्या वेगाने चालायचे. काही खडकांवर शेपूट घासण्याच्याही खुणा मिळाल्या आहेत. शेपटाच्या या खुणा डायनासोर मंदगतीने चालताना किंवा थांबून सतर्क होत असताना निर्माण झाल्या असाव्यात, असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
डायनासोरांचे घर
वुली गाव सिचुआन खोऱ्यात असून याला ‘चीनचे डायनासोर होम’ देखील म्हटले जाते. कारण येथे यापुर्वीही अनेक डायनासोरांचे जीवाश्म मिळाले आहेत. याच ठिकाणावरून हे दगड प्राप्त झाले आहेत. चीनचा डायनासोर होम सिचुआ प्रांताचा एक भाग आहे, खासकरून जिगोंग शहर आणि त्याच्या आसपासची गावे, जेथे जगातील सर्वाधिक आणि सर्वात जुन्या डायनासोरांचे जीवाश्म आढळून येतात. कोट्यावधी वर्षांपूर्वी हा पूर्ण भाग घनदाट जंगले, नद्या आणि सरोवरांनी भरलेला होता, याचमुळे ज्युरासिक काळातील अनेक डायनासोर येथे राहत होते. सिचुआन खोऱ्यातील माती आणि खडकांच्या खास रचनेने डायनासोरांची हाडं, पाऊलखुणा आणि त्वचेच्या खुणा यासारख्या गोष्टींना लाखो-कोट्यावधी वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवले. याचमुळे येथे शेकडो जीवाश्म, 400 हून अधिक पाऊलखुणा आणि अनेक दुर्लभ टेरासॉर तसेच थेरोपोड प्रजातींचे अवशेष मिळाले आहेत. जिगोंग म्युझियमही येथेच असून ज्याला चीनचे सर्वात मोठे आणि जगातील सर्वात महत्त्वपूर्ण डायनासोर म्युझियमपैकी एक मानले जाते. सातत्याने नवे शोध होत असल्याने वैज्ञानिक दरवर्षी येथे काहीतरी नवे प्राप्त करत असतात. याचमुळे या क्षेत्राला ‘चीनचे डायनासोर होम’ हे नाव मिळाले आहे.