शेअरबाजाराची सोमवारी उच्चांकी उसळी
1200 अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स बहरला, रिलायन्स नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
बजेटच्या आधी भारतीय शेअरबाजार सोमवारी कमालीच्या तेजीसोबत म्हणजे तब्बल 1200 अंकांनी वधारत बंद झालेला पहायला मिळाला. देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने दाखवलेली तेजी व बँकिंग क्षेत्रातील समभागाच्या मजबूत कामगिरीमुळे शेअरबाजार दमदार तेजीसह बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1240 अंकांनी तेजी दाखवत 71941 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 385 अंकांच्या तेजीसमवेत 21737 अंकांवर बंद झालेला पहायला मिळाला. दुपारनंतर मात्र तेजीने चांगलाच वेग घेतलेला दिसून आला. उर्जा ग्लोबलचे समभाग सर्वाधिक 20 टक्के इतके वाढत बंद झाले. गौतम अदानी समूहातील 9 कंपन्यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. यात अदानी एंटरप्रायझेसचे समभाग सर्वाधिक 6 टक्के वाढलेले होते. तर अदानी पोर्टस व अदानी एनर्जी सोल्युशन 4 टक्के वाढीसह बंद झाले होते. दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 7 टक्के वाढत व्यवहार करत होते. कंपनीच्या बाजार भांडवल मूल्याने 19 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. गेल्या एक महिन्यामध्ये या समभागाचे भाव 9 टक्क्यांपर्यंत वाढलेले आहेत. इतर कंपन्यांमध्ये पाहता टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, आयआरसीटीसी, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक आणि मुथ्थुट फायनान्स यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. पतंजली फूडस्, इन्फोसिस, देवयानी इंटरनॅशनल आणि एसबीआय कार्ड यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. तेल क्षेत्रातील कंपनी गेलचे समभाग 4टक्के तेजीत होते. तसेच पीएनबी, इंडियन ऑईल, सर्वोटेक पावर, गल्फ ऑईल, एलआयसी, बंधन बँक आणि साऊथ इंंडियन बँक यांचे समभागसुद्धा दमदार तेजीत होते. बँकिंग समभाग, जागतिक बाजारातील तेजी याचाही परिणाम तेजीसाठी कारणीभूत ठरला.