For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजाराने मकरसंक्रांत केली गोड

06:15 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजाराने मकरसंक्रांत केली गोड
Advertisement

सेन्सेक्सची 759 अंकांची उसळी : निफ्टीही नव्या विक्रमावर

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअरबाजार नव्या विक्रमाला स्पर्श करत बंद होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. मकर संक्रांतीच्यानिमित्ताने गुंतवणूकदारांना दमदार लाभ मिळवून देण्यामध्ये शेअर बाजाराने यश मिळविले आहे. सेन्सेक्स 759 अंकांनी तर निफ्टी 202 अंकांनी वधारुन बंद झाला.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक  759 अंकाच्या वाढीसह सर्वोच्च स्तरावर 73,327 अंकांवर बंद झालेला पहायला मिळाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 202 अंकांनी वाढत 22097 अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक दमदर तेजीसह बंद झाले.

कोण तेजीत, कोण घसरणीत

विप्रो, ओएनजीसी, एचसीएल टेक आणि इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी दमदार तेजी राखल्याने शेअरबाजार मोठी तेजी घेऊ शकला. एचडीएफसी लाईफ, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि हिंडाल्को यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. अदानी समूहातील 10 कंपन्यांचे समभाग नुकसानीसह कार्यरत होते.

एचडीएफसी, गार्डनरीच शिप बिल्डर, आयआरसीटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, फेडरल बँक, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय यांचे समभाग अल्पशा तेजीसह बंद झाले होते. दुसरीकडे अॅक्सिस बँक, पतंजली फुड्स, टाटा मोटर्स, मुथ्थुट फायनान्स, बजाज फायनान्स आणि अशनिशा इंडस्ट्रीज यांचे समभाग कमकुवत दिसून आले. एलआयसी, पेटीएम, साऊथ इंडियन बँक, गेल इंडिया, इंडियन ऑईल, पंजाब नॅशनल बँक यांचे समभाग तेजीत होते.

इंजिनियर्स इंडिया लिमीटेडचे समभाग सोमवारी 6 टक्के इतक्या बंपर तेजीसह 226 रुपयांवर बंद झाले. जीओ फायनान्सीयल, ओएनजीसी, पटेल इंजिनयर, कोटक महिंद्रा बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. बीएसई& मिडकॅप निर्देशांक 38,162 या नव्या विक्रमासह बंद झाला.  दिवसभराच्या सत्रात सेन्सेक्स निर्देशांक 73,402ची आणि निफ्टीने 22,115 अंकांची विक्रमी पातळी गाठली होती. आयटी क्षेत्रामध्ये तसेच फार्मा आणि बँकिंग क्षेत्रातदेखील गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी केल्याचे पहायला मिळाले.

जागतिक बाजारात मिळताजुळता कल

जागतिक बाजारामध्ये अमेरिकेतील नॅसडॅक निर्देशांक अल्पशा तेजीत तर डोव जोन्स 77 अंकांनी घसरणीत होता. युरोपातील बाजारातसुद्धा घसरण पहायला मिळाली. आशियाई बाजारात निक्की 325 अंकांनी तेजीत होता. कोस्पी आणि शांघाय कंपोझिट यांचे निर्देशांक अल्पशा तेजीसह कार्यरत होते

Advertisement
Tags :

.