सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करणार
आमदार सतीश कृष्णा सैल यांची पत्रकार परिषदेत ग्वाही
कारवार : आगामी अर्थसंकल्प मांडताना येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यात आले नाही तर राजकारणातून निवृत्त होण्याचा इशारा कारवार अंकोलाचे आमदार सतीश कृष्णा सैल यांनी दिला आहे. ते मंगळवारी काळी नदीवरील नियोजित नवीन पूलस्थळी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, येथे सुपर स्पेशालिटी व्हावे म्हणून गेल्या तीन वर्षांपासून आपण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करीत आहे. येथे सुपर स्पेशालिटी नसल्याने येथील रुग्णांना गोवा किंवा जवळच्या अन्य शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयावर अवलंबून रहावे लागत आहे. येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय नसल्याने स्वत: आपणावर दिल्ली येथील रुग्णालयात उपचार करून घ्यावे लागले.
त्यामुळे येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची फार आवश्यकता आहे. अद्ययावत रुग्णालय नसल्याने येथील जनतेला फार मोठा त्रास होत आहे. येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, असे स्पष्ट केले. आमदार सैल पुढे म्हणाले, मार्चअखेर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची सरकारकडून घोषणा झाली पाहिजे. तसे झाले नाही तर आपण पक्षाचा (काँग्रेसचा) राजीनामा देवून अन्यत्र जाणार नाही तर आमदार पदाला रामराम ठोकत, राजकारणातून निवृत्त होणार आहे. राजकारण करण्यापेक्षा आपण घरी राहणे पसंत करेन. आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची घोषणा करण्यात आली नाही तर दुसऱ्याच दिवशी आपण आमदारकीचा राजीनामा देण्याचा पुनरूच्चार करून अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. कोणतेही काम करणार नाही. आयएम नॉट फीट फॉर पीपल असे समजून घेईन, असे स्पष्ट केले.