Kolhapur News : इचलकरंजीत धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत..!
कबनूर येथे संभाजी महाराज पुतळ्याचे ऐतिहासिक स्वागत
इचलकरंजी : इचलकरंजी येथील मलाबादे चौकातील श्री शंभुतीर्थावर उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे बुधवारी कबनूर येथे आगमन होताच प्रथमदर्शन सोहळ्याने ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. मंत्रोच्चार, शंखनाद, पुष्पवृष्टी आणि जयघोषाच्या वातावरणात झालेल्या या आगमन सोहळ्याने परिसर क्षणात उत्सवमय झाला होता.
मोरवाडी, कोल्हापूर येथील शिल्पकारांनी साडेपंधरा क्विंटल ब्राँझपासून साकारलेला, सुमारे ११ फूट उंचीचा हा भव्य पुतळा तेजस्वी मुद्रेतील आहे. पुतळा इचलकरंजी शहरात दाखल होताच नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी करत स्वागत केले. आगमनानंतर पुतळ्याचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी आमदार राहुल आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, कबनूर सरपंच सुलोचना कट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने, स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह प्रसाद जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्यावरील वस्त्र हटवताच उपस्थितांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यानंतर इचलकरंजी शहरात पुतळ्याचे विविध ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचताच विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचे नाद, पारंपरिक व आधुनिक वाद्यांचा मेळ आणि उत्साही नागरिकांच्या सहभागामुळे वातावरण आणखी भारावले. मिरवणुकीच्या मार्गावर सजवलेल्या रांगोळ्या, ठिकठिकाणी करण्यात आलेली पुष्पवृष्टी तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित दृश्यफिती मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मिरवणुकीचे हजारो नागरिकांनी दर्शन घेतले.येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने पुढील काही दिवसांत पुतळ्याच्या प्रतिष्ठापना कामाला वेग येणार असून लवकरच लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली.