नेत्यांचे ‘आकडेशास्त्र’ सध्या जोरात
राजकीय पक्षांची अनुमाने
यंदाची लोकसभा निवडणूक आता पूर्ण होत आली आहे. मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून केवळ दोन उरलेले आहेत. तसेच बहुतेक राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जसजशी निवडणूक पुढे जात आहे, तसा सर्व पक्षांच्या नेतेमंडळींच्या ‘आकडेशास्त्रा’लाही जोर चढत चालला आहे. किती जागा मिळणार, कोणाचे सरकार येणार, कोणाचे जाणार, कोणाला जनता धडा शिकविणार इत्यादी घोषणा केल्या जात आहेत. राजकीय पक्षांना या कामात त्यांचे समर्थक असणारे ‘विचारवंत’ आणि ‘अभ्यासक’ साहाय्य करीत आहेत. विविध वृत्तवाहिन्याही आपली भर यात टाकत आहेतच. मतगणना होण्याआधीच प्रत्येक पक्ष किंवा आघाडी आपल्या विजयाचे नगारे वाजविण्यात मग्न आहे. ज्या मतदाराच्या हाती या भविष्यवाण्या खऱ्या किंवा खोट्या ठरविण्याचे सामर्थ्य आहे, त्याचे यामुळे मनोरंजन मात्र चांगलेच होत आहे. आकड्यांचा हा खेळ कितपत खरा मानायचा, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. या खेळावर एक दृष्टीक्षेप...
भारतीय जनता पक्ष आणि रालोआ
? सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निवडणुकीला प्रारंभ होण्याआधीच ‘अबकी बार 400 पार’ चा नारा दिलेला होता. या पक्षाचे नेते आजही या संख्येवर ठाम असल्याचे दिसून येते. मतदानाच्या प्रथम चार टप्प्यांमध्ये 380 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले होते. त्यांच्यापैकी 270 जागी सत्ताधारी आघाडीने विजय मिळविला आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी प्रचार सभांमध्ये केली आहे.
? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीच्या प्रचार काळात 40 हून अधिक मुलाखती विविध वृत्तसंस्थांना दिल्या आहेत. अगदी अलिकडच्या मुलाखतींमध्येही त्यांनी ‘400 पार’ होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचे इतर नेतेही ही संख्या निश्चितपणे गाठली जाईल, असे ठामपणे बोलत आहेत. भारतीय जनता पक्षाची लाट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनता सलग तिसऱ्यांदा निश्चितच संधी देईल, असे हा पक्ष आत्मविश्वासपूर्वक म्हणत आहे.
विरोधी पक्ष आणि त्यांची आघाडी
? काँग्रेसच्या म्हणण्यानुसार यावेळी देशात परिवर्तन घडणार आहे. भारतीय जनता पक्षाला 150 हून अधिक जागा मिळणार नाहीत, असे भाकित या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जाहीररित्या केले आहे. तर याच पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय जनता पक्षाला 40 जागा गाठणेही कठीण जाईल, असे विधान केलेले आहे. या निवडणुकीचा प्रारंभ होण्यापूर्वी या पक्षाचे खासदार शशी थरुर यांनी भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल, असे भाकित केले होते.
? विरोधी पक्षांच्या आघाडीतील इतर पक्षही त्यांचे आकडे देत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यामते भारतीय जनता पक्षाला 200 हून अधिक जागा मिळणार नाहीत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी हा आकडा 140 पेक्षाही खाली आणला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या मते भारतीय जनता पक्ष 160 च्या पुढे जाणार नाही. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनीही या पक्षाला 220 च्या आसपास ठेवले आहे.
राज्यांमधीलही आकडेशास्त्र
उत्तर प्रदेश
? देशात किती जागा मिळतील हे जसे नेत्यांकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे, तसे विविध राज्यांमध्ये हे आकडे कसे असतील, याचीही घोषणा केली जात आहे. अखिलेश यादव यांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी तब्बल 79 जागा विरोधकांची आघाडी जिंकणार आहे. तर भारतीय जनता पक्षानेही उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागा आम्हीच जिंकणार, अशी घोषणा केलेली आहे. या पक्षाचे इतर नेतेही अशीच आकडेवारी उत्तर प्रदेशसंबंधी घोषित करीत आहेत.
महाराष्ट्र
? उत्तर प्रदेश खालोखाल जागा महाराष्ट्रात असून त्या 48 आहेत. त्यांच्यापैकी 30 ते 35 जागा महाविकास आघाडी जिंकणार असे या आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. आता महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा आकडा 40 पर्यंत वाढविण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या महायुतीनेही 45 जागांचे लक्ष्य आम्ही पार करणारच असे आत्मविश्वासपूर्वक सांगितले असून विरोधकांचे आकडे निरर्थक ठरविले आहेत.
इतर राज्ये
? बिहार आणि कर्नाटक या राज्यासंबंधीही अशीच आकडेवारी दिली जात आहे. कर्नाटकात काँग्रेस 15 ते 17 जागा जिंकणार, असे तेथील काँग्रेस नेते म्हणत आहेत. भारतीय जनता पक्षाचे म्हणणे 28 पैकी 25 जागा आम्ही जिंकणार असे आहे. बिहारमध्ये 40 जागा आहेत. यावेळी तेथे क्रांती घडणार असे राजद या पक्षाचे म्हणणे आहे, तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राज्यातील 40 पैकी 40 जागांवर आपला अधिकार सांगितल्याचे दिसून येते.
अर्थ लावायचा कसा...
? विविध पक्ष, आघाड्या आणि विश्लेषक यांच्या या भाकितांचा अर्थ कसा लावायचा आणि त्यातून निश्चित निष्कर्ष कोणता काढायचा हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. सर्व पक्षांची आणि सर्व विश्लेषकांची अनुमाने खरी ठरायची असतील, तर लोकसभेच्या जागा आत्ता आहेत त्यापेक्षा किमान दुपटीने वाढवाव्या लागतील. तसे केले तरीही अनुमाने खरी ठरतीलच याची शाश्वती नाही.
? प्रत्येक निवडणुकीच्या काळात हा आकड्यांचा खेळ अशाच प्रकारे खेळला जातो. तो मतगणनेपर्यंत चालतो. त्यानंतर पुढच्या निवडणुकीपर्यंत विसरला जातो. आणि नव्या निवडणुकीची घोषणा झाली, की नव्या दमाने खेळला जातो. खरे, नि:पक्षपाती विश्लेषण आणि वस्तुस्थितीवर आधारित अनुमान अनुभवायला मिळणे हे मतदारांच्या ललाटी लिहिलेले नाही, हाच एकमेव निष्कर्ष यातून काढता येतो.
? खरे, तर मतदारांनी पाचव्या टप्प्यासह 429 मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य आता निश्चित केलेले आहे. केवळ 114 मतदारसंघ उरलेले आहेत. एक प्रकारे पाहिले असता 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निर्णय झाला आहे, किंवा होण्याच्या अगदी जवळ आलेला आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हटले तरी आणखी दोन आठवड्यांमध्येच स्थिती सर्वांसमोर येणारच आहे.
? केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान काळात ओपिनियन पोल, किंवा एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. तशीच बंदी या अनुमानित आकड्यांच्या घोषणांवर घालता आली, तर निवडणूक अधिक चांगल्या प्रकारे पार पडेल. आकड्यांचा हा खेळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी खेळला जातो. तो थांबला, तर निवडणुकांमधील गांभीर्य मतदारांपर्यंत अधिक चांगल्या रितीने पोहचणार आहे.
विश्लेषक, पत्रकारांचेही आकडेशास्त्र
? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची भविष्यवाणी करण्यात राजकीय विश्लेषक आणि पत्रकारही अर्थातच मागे नाहीत. माजी निवडणूक सर्वेक्षक योगेंद्र यादव यांनी यावेळी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळून 260-270 च्या आसपास जागा मिळतील, अशी भविष्यवाणी नुकतीच केली आहे. तर आणखी एक मान्यवर निवडणूक सर्वेक्षक प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्ष 2019 पेक्षा अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा सत्ताधीश होतील, असे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्पष्ट केले आहे. एकंदर विश्लेषकांमध्येही मतभेद नेहमीप्रमाणे आहेतच.