राज्यातील पहिल्या तृतीयपंथी टूरिस्ट गाईड
कोल्हापूर :
पारंपारिक रुढी-प्रथांना छेद देत तृतीयपंथी ही ओळख मागे टाकत सुहासिनी आळवेकर यांनी पर्यटनक्षेत्रात आपली वेगळी निर्माण केली आहे. सामाजिक संघटनाची जबाबदारी पार पाडत गेल्या एक वर्षापासून त्या टूरीस्ट गाईड म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
तृतीय पंथी म्हंटले की समाज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. समाजकडून त्यांची अवहेलनाही होते. त्यांनाही सन्मानाने जगण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ त्यांना होत आहे. अनेक तृतीयपंथी उच्च शिक्षित असून शिवाजी विद्यापीठात पीएच.डी.करत आहेत. शिक्षणातून वेगळी वाट शोधत अर्थार्जन करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे सुहासिनी आळवेकर आहेत. सुहासिनी यांचे इंदूमती गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर मयूरीताई आळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी काम करणाऱ्या मैत्री संघटनेच्या कामात भर दिला.
दरम्यान,कोल्हापूरात टूरिस्ट गाईड घडवण्यासाठी 25 जानेवारी 2024 रोजी हॉटेल-मालक चालक संघाची बैठक झाली. या बैठकीत एक टूरिस्ट गाईड म्हणून तृतीयपंथीय असलेल्या सुहासिनी आळवेकर यांचे नाव पुढे आले. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे या नावाबाबत चर्चा झाली. रेखावार यांनी सुहासिनी आळवेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि तिथून पुढे पर्यटन क्षेत्रात आळवेकर यांचा प्रवास सुरु झाला. यानंतर सुहासिनी यांनी गाईडचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कारवाँ हॉलिडेजचे वसिम सरकवास यांच्याकडे त्यांनी काम सुरु केले. कर्नाटकातील गुलबर्गा येथील 30 लोकांची पहिलीच सहल त्यांनी केली. या सहलीतील पर्यटकांना सामोरे जाताना सुरुवातीला त्यांच्यासमोर दडपण निर्माण झाले. पण प्रत्यक्षात संवाद सुरु झाला त्यावेळी पूर्ण दडपण नाहीसे होऊन पर्यटकांशी मैत्रीत रुपांतर झाले. या सहलीतून एक गाईड म्हणून आत्मविश्वास आणखी वाढला. कोल्हापूरात पर्यटकांची संख्या वाढत असून येणाऱ्या पर्यटकांना ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवण्याबरोबर माहिती देण्याचे काम त्या करत आहेत. कोल्हापूरसह कोकणातील सहलीही अटेंड करत आहे. या माध्यमातून कामाचा आनंद मिळत आहेच, पण जग काय असते याचा अनुभव येत असल्याचे सुहासिनी यांनी सांगितले. आठवड्यापूर्वी 92 विद्यार्थ्यांची सहल आली होती. या विद्यार्थ्यांना कोकण दर्शन घडवले. त्या विद्यार्थ्यांकडून सुध्दा चांगला प्रतिसाद मिळाला.
लोकांमध्ये मिसळून काम करण्याची संधी
तृतीयपंथी हे सुध्दा माणसेच आहेत.पण समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.अशावेळी पर्यटन क्षेत्रात गाईड म्हणून काम करणे आव्हानात्मक होते.पण काम सुरु केल्यावर वेगळा आणि चांगला अनुभव आला.आम्ही सुध्दा कोणत्याही क्षेत्रात काम करु शकतो.या माध्यमातून लोकांमध्ये मिसळून काम करण्याची संधी मिळते.
सुहासिनी आळवेकर,पहिल्या तृतीयपंथी गाईड