'नॉन स्पेशल' इमारत उंचीचा प्रश्न सोडविणार
आमदार राजेश क्षीरसागर यांची ग्वाही
प्रलंबित प्रश्नांबाबतत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
क्रिडाईतर्फे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांचा सत्कार
कोल्हापूर
शहर परिसरातील नॉन स्पेशल इमारतींच्या उंचीची मर्यादा 25 मीटरपर्यंत वाढवून मिळावी अशी कोल्हापूर क्रिडाईची मागणी आहे. त्यांची ही मागणी प्राधान्यक्रमाने पूर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. तसेच इमारतींची उंची वाढवून मिळण्यासह जिल्ह्यातील अन्य प्रमुख प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठीही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरु ठेवणार असल्याचेही आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
क्रिडाई कोल्हापूरतर्फे गुरुवारी रेसिडेन्सी क्लब येथे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार क्षीरसागर बोलत होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन समोर ठेवले आहे. जिल्ह्याची बांधकाम, औद्योगिक, व्यापर आणि कृषी क्षेत्रात विकासात्मक घोडदौड सुरु आहे. विकासाची ही घोडदौड पुढील काळात कायम राहण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. क्रीडाईची प्रमुख मागणी असलेले आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरसाठी 50 कोटींचा निधी वर्ग झाला असून काम लवकरच सुरु होईल. 3200 कोटींचा पूरनियंत्रणाच्या कामासही एप्रिल 2025 पुर्वीच सुरुवात होईल. पूरबाधित क्षेत्रातील ब्ल्यू लाईनमधील टीडीआरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. राजर्षी शाहू मील सुधारणा, खंडपीठ, आयटी पार्क, टेक्नॉलॉजी पार्क, फौंड्री हब, रिंग रोड, परीख पूल हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन शहराची हद्दवाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी क्रिडाईचे अध्यक्ष कृष्णात खोत, माजी अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सेक्रेटरी संदीप मिरजकर यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.