राज्याला मुसळधार पावसाने झोडपले
पणजी : गोव्याला मंगळवारीही मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढल्यानंतर उत्तर गोव्यातील अनेक नद्यांना पूर आला. कर्नाटकातील डोंगरमाथ्यावर मुसळधार पाऊस पडल्यानंतर म्हादई नदीला पूर आला आहे. पाण्याची पातळी अनेक भागात वाढल्यामुळे अनेक भागात पाणी शिरले. आज यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर हवामान खात्याने दुपारी अचानक ऑरेंज अलर्ट जारी केला, तो बुधवारी पहाटेपर्यंत राहील. बुधवारी यलो अलर्ट आहे. तथापि या काळातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या 24 तासात गोव्यात सर्वत्र रात्रभर पाऊस कोसळला तसेच सकाळी देखील बऱ्याच भागात जोरदार पाऊस सुरू होता. गोव्याच्या पूर्वोत्तर भागात म्हणजेच सांखळी व सत्तरी या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यानंतर सांखळी तसेच डिचोलीच्या नद्यांना पूर आला, मात्र तो मर्यादित होता. डोंगरमाथ्यावर पडलेल्या मुसळधार पावसामुळे म्हादई नदीला पूर आला आणि या पुराचे पाणी अनेक भागात शिरले. काही भागात रस्ते पाण्याखाली गेले. मात्र सायंकाळी पावसाचे प्रमाण थोडे मर्यादित राहिले. आषाढीतील पाऊस हा नेहमीच मुसळधारपणे कोसळतो, मात्र यंदा पावसाचे प्रमाण त्या तुलनेत कमी राहिले. परंतु बंगालच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम गोव्यावर झालेला आहे. गोवा तसेच महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सर्वाधिक 3.50 इंच पाऊस साखळीत
गेल्या 24 तासात गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला, सरासरी अडीच इंच पावसाची नोंद झाली. सर्वाधिक साडेतीन इंच पाऊस सांखळीत पडला. केपे, फोंडा व जुने गोवे येथे प्रत्येकी सव्वातीन इंच, काणकोण, धारबंदोडा व सांगे येथे प्रत्येकी तीन इंच, तर पणजीत अडीच इंच पाऊस झाला. पेडणे, मडगाव येथे प्रत्येकी दोन इंच, मुरगाव येथे दीड इंच, दाबोळी व म्हापसा येथे प्रत्येकी एक इंच पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात पडलेल्या अडीच इंच पावसामुळे यंदाच्या मोसमातील पाऊस आता 56 इंच झाला आहे. आगामी 24 तासात गोव्यात जोरदार पाऊस त्याचबरोबर वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. काहीवेळा हे वारे ताशी 60 किलोमीटर या वेगाने देखील वाहण्याची शक्यता असल्याने पारंपरिक मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे.