राज्याला पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
रविवारी राज्यात अनेक भागात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर काही ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये आज मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर अकोला, बुलडाणा, जालना, हिंगोली, वाशिम, परभणी या जिल्ह्यांमध्ये आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील उत्तरे भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात गारा पडण्याची सुद्धा शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर २७ तारखेनंतर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अती हलक्या व हलक्या तर विदर्भात २८ तारखेनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे व परिसरात आज सामान्यत: ढगाळ वातावरण असेल तर दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ होण्याची तसेच मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.