पंचहमी योजनांमुळे राज्य सरकार देशासाठी आदर्श
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : पंचहमी कार्यशाळा-प्रगती आढावा बैठक, गरिबांच्या कल्याणासाठी दरवषी अनेक योजना
बेळगाव : राज्य सरकार हे गरिबांच्या हिताचे आहे. सुमारे 70 वर्षांपासून प्रत्येक सरकारच्या काळात जमीन मंजूर, शैक्षणिक प्रगती, वाहतूक व्यवस्थेसह अनेक योजना राबवल्या आहेत. सध्याच्या राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात पंचहमी योजना राबवून देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. रविवार दि. 30 रोजी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंचहमींच्या अंमलबजावणीवरील जिल्हा पंचहमी कार्यशाळा आणि प्रगती आढावा बैठकीचे उद्घाटन करून ते बोलत होते.
पंचहमी योजना अंमलबजावणीपूर्वी अनेक टीका करण्यात आल्या. मात्र, या योजना राबविण्यासाठी आणि गरिबांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार दरवषी गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी पंचहमी योजना यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. त्यामुळे या योजना राज्यातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोचल्या पाहिजेत.
हमी योजनांशी संबंधित तांत्रिक त्रुटी येत्या काळात दूर केल्या जातील. राज्य सरकार हमी योजनांसह सिंचन, रस्ते व शिक्षण यासह इतर अनेक विकास कार्यक्रम हाती घेत आहे. प्रत्येक व्यक्तीला अंदाजे पाच हजार ऊपये दिले जात आहेत. प्रत्येकाने हे पैसे चांगल्या कामासाठी वापरावेत. पाच वर्षांसाठी तीन लाख कोटी ऊपये राखीव ठेवले जातील, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
राज्य हमी योजना प्राधिकरणाचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा म्हणाले, पंचहमी योजनांच्या अंमलबजावणीमुळे आज राज्यात अनेक बदल दिसून येत आहेत. या योजना यशस्वीरित्या राबविल्या जात असून पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीदेखील अनेक लोकहित कार्य योजना राबविल्या आहेत, असे ते म्हणाले, राज्य हमी योजना प्राधिकरणाचे उपाध्यक्ष एस. आर. पाटील म्हणाले, 2023 च्या निवडणुकीपूर्वी पंचहमी योजना लागू केल्या जातील, असे सांगितले होते त्यानुसार राज्य सरकारने सत्तेत येताच पंचहमी पैकी एक शक्ती योजना लागू केली व दिलेले वचन टप्प्याटप्प्याने अंमलात आणले.
राज्यात क्रांतिकारी बदल
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, सरकारने सत्तेत येताच पंचहमी योजना टप्प्याटप्प्याने राबवून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून राज्यात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. हा एक देशासाठी आदर्श असल्याचे ते म्हणाले. आमदार असिफ शेठ म्हणाले, राज्य सरकार सत्तेत येऊन अडीच वर्ष झाले आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हमी योजना यशस्वीरित्या राबविल्या जात आहेत. सरकार हमी योजनांसह अनेक विकासकामे करत आहे.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले मुत्तूराज म्हणाले, बरीच टीका होऊनही राज्य सरकारने पंचहमी योजना यशस्वीरित्या अंमलात आणून टीकाकारांना उत्तर दिले आहे. शक्ती योजनेअंतर्गत 10 अब्जाहून अधिक प्रवाशांनी मोफत प्रवास केला आहे. गृहलक्ष्मी योजनेमुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहेत.
या कार्यक्रमाला आमदार गणेश हुक्केरी, हमी योजना प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, काडा अध्यक्ष युवराज कदम, सुनील हनमण्णावर, जिल्हा आणि विविध तालुक्यातील हमी योजना प्राधिकारचे पदाधिकारी, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, महिला व बालकल्याण खात्याचे सहसंचालक एम. एन. चेतनकुमार, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक, केएसआरटीसीचे डीटीओ के. एल. गुड्डेण्णावर, चिकोडीचे डीटीओ एम. आर. मुंजी, हेस्कॉमचे मुख्य अभियंता प्रवीणकुमार चिकडे, गुऊपादय्या हिरेमठ, राजेश हिरेमठ उपस्थित होते.
जि. पं. चे उपसचिव बसवराज हेगनायक यांनी लाभार्थांसाठी माहिती असलेली यशोगाथा पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आणि लाभार्थांना पंचहमी योजनेच्या अंमलबजावणीमुळे मिळालेल्या फायद्याविषयी आपले मत मांडले. कार्यक्रमापूर्वी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सर्कल येथून कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत जागृतीफेरी काढण्यात आली.