केंद्राकडून राज्याला मिळाला 281 कोटींचा करपरतावा
पणजी : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गोव्याला नोव्हेंबर महिन्याचा मासिक कर वाटप म्हणून 281.63 कोटी ऊपये वितरित केले आहेत. केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यासाठी राज्य सरकारांना कर वाटप अर्थात केंद्रीय कर आणि ड्युटी यांची निव्वळ रक्कम वेळापत्रकापेक्षा 3 दिवस आधीच म्हणजे 10 ऐवजी 7 नोव्हेंबर रोजी जारी करण्यास सांगितले आहे. याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी समाधान व्यक्त केले असून अशी रक्कम मिळाल्यामुळे सणासुदीच्या काळात सरकारला मदत होईल, असे म्हटले आहे. या करपरताव्याचा सर्वाधिक लाभ उत्तर प्रदेशला झाला असून त्यांना 13,088.51 कोटी ऊपये तर बिहारला 7,338.44 कोटी ऊपये मिळाले आहेत. सर्वात कमी रक्कम गोव्याला 281 कोटी आणि सिक्कीमला 283.10 कोटी ऊपये मिळाले आहेत. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार 2023-24 या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार केंद्राने यावर्षी राज्यांना 10.21 लाख कोटी ऊपये हस्तांतरित करण्याची अपेक्षा केली आहे.