किल्ले रायगडावरील पायरी मार्ग १५ ऑगस्टपर्यंत बंद
खेड :
अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावर संभाव्य आपत्तीमुळे जीवितहानी अथवा वित्तहानी टाळण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत गडावरील पायरी मार्ग बंद राहणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश पारित केले आहेत.
२० जून रोजी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील पाऊल वाटांवर दगडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. दगडी कोसळून कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा वित्तहानी होवू नये, यासाठी पायरी मार्ग पर्यटकांसह सर्व नागरिकांसाठी प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
जुलै महिन्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गडावरील नाणे दरवाजा, चित्त दरवाजा तसेच किल्ले रायगड येथे पुरेसा बंदोबस्त ठेवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जावळे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.