वक्फ नोटिशीच्या विरोधात आजपासून जनजागृती मोहीम
आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ करणार नेतृत्त्व : प्रदेशाध्यक्षांचा गट अभियानापासून दूर राहण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजपचे असंतुष्ट नेते, आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या नेतृत्त्वाखाली वक्फ नोटिशीच्या विरोधात जनजागृती मोहीम सोमवारपासून सुरू होणार आहे. या अभियानामुळे दुफळीच्या राजकारणाने त्रस्त असलेल्या भाजपमध्ये नवा उत्साह निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या जनजागृती अभियानापासून प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचा गट दूर राहण्याची शक्मयता आहे.
तीन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपमध्ये या घडामोडीने गटबाजीला आणखी बळ मिळाले आहे. यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या जनजागृती मोहिमेत पक्षाच्या कोणत्याही आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये, अशी तोंडी सूचना विजयेंद्र यांनी दिल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींची परवानगी न घेता आणि पक्षाचे चिन्ह न वापरता एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी राबविल्या जाणाऱ्या या अभियानापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात वक्फविरोधात भाजपची लढाई सुरू असताना यत्नाळ यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने वेगळा लढा देत आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या टीमने बिदर ते चामराजनगर अशी पदयात्रा आयोजित केली आहे. दरम्यान, 3 पथके वक्फविरुद्ध जनजागृती मोहीम आयोजित केली आहे. याच मुद्यावरून पक्षातील दोन गटांच्या लढतीमुळे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्मयता आहे. सोमवारपासून सीमावर्ती जिल्ह्यातील बिदरमध्ये यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली वक्फ लढा सुरू होणार आहे.