दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आदर्शवत बनवणार
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयासाठी वाढीव डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचारी नियुक्त करण्याबरोबरच अतिरिक्त सीसीटीव्ही, सुधारित प्रकाशव्यवस्था, जादा सुरक्षा कर्मचारी आणि रुग्णवाहिका आदी सुविधा देण्यावर सरकारने भर दिला आहे. दक्षिण गोव्यातील रहिवाशांनी त्यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर सरकार गांभीर्याने विचार करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
शनिवारी मिरामार येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक राजेश बोरकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
आम्ही या रुग्णालयाला तृतीय श्रेणीतील सुविधेत आणण्याचा प्रस्ताव सरकारला देणार असून अधिक सेवा देण्यात येतील, असे राणे यांनी पुढे सांगितले. या रुग्णालयास रोज किमान 1,600 रुग्ण भेट देत असतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा, सुलभता देण्याच्या संकल्पनेतील आरोग्य सेवा लोकांना देणे आवश्यक आहे, असे राणे पुढे म्हणाले.
आयसीयू आता कार्यरत आहे आणि प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी आम्ही अधिक कर्मचारी नियुक्त करणार आहोत. याव्यतिरिक्त, गोवा विकास ट्रस्टच्या माध्यमातून सीएसआर अंतर्गत 2 ऊग्णवाहिका दान करण्यात येणार आहेत. राज्यातील लोकांच्या हितासाठी अथक परिश्रम करणे, त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची खात्री करणे हे आमचे उद्दिष्ट्या आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टीसीपी मंत्रीपद ही केंद्रीय नेतृत्वाची देण : राणे
दरम्यान, अन्य एका प्रश्नावर बोलताना मंत्री राणे यांनी, आपणास प्राप्त झालेले नगरनियोजन खात्याचे मंत्रीपद हे केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आले असल्याचे सांगितले. कुठेही काहीही झाले तरी लोक टीसीपी खात्याकडे बोट दाखवतात. काही लोकांना खात्याकडून होत असलेल्या कामांचा धडाका पाहून हेवा वाटतो. त्यामुळेच या खात्याबद्दल रोज आरोप, टीका होत असते, असेही ते म्हणाले.
या खात्याचे मंत्रीपद प्राप्त होण्यापूर्वी त्याच सरकारच्या कार्यकाळात 1.5 कोटी चौ. मी. जमिनीचे रूपांतर झाले होते. जेव्हा प्रादेशिक आराखडा बनविण्यात आला तेव्हा 9.5 कोटी चौरस मीटरचे रूपांतर झाले होते. मात्र नंतर त्यातील 8.5 कोटी चौरस मीटर जमीन पुन्हा अरुपांतरीत करण्यात आली, अशी माहिती राणे यांनी दिली.