ध्वनीव्यवस्थेचे तीनतेरा अन् विधेयके बारा
विरोधी पक्षांचा जोरदार शाब्दिक हल्ला : सरकारचा गळा बसल्याची बोचरी टीका
बेळगाव : विधानसभेतील ध्वनीव्यवस्था बंद पडल्यामुळे तब्बल पंधरा मिनिटे कामकाज तहकूब करावे लागले. ध्वनी व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात करण्यात आली. ध्वनी व्यवस्था बंद असतानाच विधानसभेत अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बारा विधेयके मांडण्यात आली. ध्वनी व्यवस्था बंद पडल्याने विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर खोचक टिप्पणी केली.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभाध्यक्ष यु. टी. खादर फरीद यांनी विधेयके मांडण्यासाठी परवानगी दिली. परिवहनमंत्री रामलिंगारेड्डी यांच्यामार्फत एच. के. पाटील यांनी 2025 च्या श्री मलैमहादेश्वर क्षेत्र विकास प्राधिकरण (दुरुस्ती) विधेयक मांडले. रामलिंगारेड्डी यांच्यावतीने त्यांनी कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था व धर्मादाय (दुरुस्ती) विधेयक, चंद्रगुत्ती श्री रेणुकाम्बा क्षेत्र विकास प्राधिकरण विधेयक, श्री चामुंडेश्वरी क्षेत्र विकास प्राधिकरण (दुरुस्ती) विधेयक मांडले. आरोग्य मंत्र्यांच्यावतीने मंत्री एच. के. पाटील यांनी औषध व प्रसाधन सामग्री (दुरुस्ती) विधेयक, कृषीमंत्र्यांच्यावतीने कर्नाटक भाडे (दुरुस्ती) विधेयक मांडले.
कामगार मंत्री संतोष लाड यांनी कर्नाटक कामगार कल्याण निधी (दुरुस्ती) विधेयक, कर्नाटक सिने व सांस्कृतिक कार्यकर्त्यांचे क्षेमाभिवृद्धी (दुरुस्ती) विधेयक मांडले. एच. के. पाटील यांनी उच्च शिक्षणमंत्री डॉ. एस. सी. सुधाकर यांच्यामार्फत कर्नाटक राज्य विद्यापीठांचे दुसरे विधेयक मांडले. डी. सुधाकर यांच्यामार्फत पठारी प्रदेश विकास मंडळ (दुरुस्ती) विधेयक व मलनाड विकास मंडळ (दुरुस्ती) विधेयक मांडले.
ध्वनीव्यवस्था बंद असताना 10 विधेयके सादर
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी कर्नाटक प्रक्षोभक भाषण व द्वेष पसरविणाऱ्या गुन्हे प्रतिबंधक विधेयक मांडले. बारापैकी दहा विधेयके ध्वनीव्यवस्था बंद असताना मांडण्यात आली. त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी उत्तर कर्नाटकाचा गळा कोणी घोटला? असा खोचक सवाल उपस्थित केला. विधेयके मांडण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ध्वनीव्यवस्था सुरळीत झाली नाही. त्यामुळे 11.38 वाजता सभाध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. ही व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर 11.59 वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली.
...ही पहिली वेळ
विधिमंडळाच्या इतिहासात ध्वनीव्यवस्था नादुरुस्त झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब केल्याची ही पहिली वेळ असल्याचे सांगण्यात येते. तांत्रिक बिघाड दूर करून ध्वनीव्यवस्था सुरळीत करण्यात आली. त्यानंतर कामकाज सायंकाळपर्यंत सुरळीतपणे चालले. विरोधी पक्षाचे आमदार अरग ज्ञानेंद्र यांनी सरकारचाच गळा बसला आहे, अशी बोचरी टीका केली.
विधानसभेत सादर झालेली विधेयके
- श्री मलैमहादेश्वर क्षेत्र विकास प्राधिकरण विधेयक
- कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था व धर्मादाय विधेयक
- चंद्रगुत्ती श्री रेणुकाम्बा क्षेत्र विकास प्राधिकरण विधेयक
- श्री चामुंडेश्वरी क्षेत्र विकास प्राधिकरण विधेयक
- औषध व प्रसाधन सामग्री (दुरुस्ती) विधेयक
- कर्नाटक भाडे नियंत्रण (दुरुस्ती) विधेयक
- कामगार कल्याण निधी विधेयक
- सिने-सांस्कृतिक कार्यकर्त्यांचे क्षेमाभिवृद्धी विधेयक
- कर्नाटक राज्य विद्यापीठांचे दुसरे विधेयक
- पठारी प्रदेश विकास मंडळ विधेयक
- मलनाड विकास मंडळ विधेयक
- प्रक्षोभक भाषण व द्वेष गुन्हे प्रतिबंधक विधेयक