कारवार जेलमध्ये मंगळूरच्या सहा कैद्यांचा पुन्हा उच्छाद
वस्तूंच्या वापरावर निर्बंध आणल्याने कैदी संतप्त
कारवार : येथील जेलमध्ये मंगळूरमधील दाखल करण्यात आलेल्या कुख्यात कैद्यांनी कारवारचे जेलर आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असताना येथील जेलमधील मंगळूरच्या सहा कैद्यांनी मंगळवारी रात्री उच्छाद मांडल्याची घटना घडली आहे. गेल्या रविवारी 7 रोजी मंगळूर येथील कुख्यात कैदी मोहम्मद अब्दुल फयान आणि निहाल कौशिक यांनी जेलर कल्लाप्पा गस्ती तसेच अन्य कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. एकाच आठवड्यात कारवार जेलमध्ये कैद्यांकडून कायदा हाती घेण्याची घटना दुसऱ्यांदा घडल्याने जेल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे सांगण्यात आले.
मंगळवारी रात्री कारवार जेलमध्ये घाडलेल्या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, मंगळूरमधील जेलमध्ये कैद्यांची संख्या वाढल्याने सुरक्षीततेच्या कारणासाठी मंगळूरमधील काही कुख्यात कैदी कारवारमधील जेलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. कैद्यांच्या बाबतीत कारवार जेलच्या अधिकाऱ्यांनी कडक धोरण स्वीकारले आहे. यामध्ये कैद्यांच्या मोबाईल वापरावर बारीक नजर ठेवणे, जेलमध्ये अंमली पदार्थ आणून देणे, जेलमध्ये येणाऱ्यापासूनची कसून तपासणी करणे, कैद्यांना भेट देणाऱ्यांची तपासणी, चौकशी करणे, आदी धोरणांचा समावेश आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगार, कैदी केवळ संतापलेच नाहीत तर चवताळले आहे. जेल प्रशासनाच्या कडक धोरणामुळे जेलमधून अंमली पदार्थ विक्री खरेदी करण्याचे रॅकेट चालविणाऱ्यांच्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत.
जेल प्रशासनावरील रागापोटी रविवार दि. 7 रोजी घटना घडली होती. रविवारच्याघटनेनंतर जेल प्रशासनाने त्या दोन कुख्यात कैद्यांच्या बाबतीत आणखीन कडक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे त्या दोन कैद्यांचाजेलमधील अन्य सहा सहकाऱ्यांनी (कैद्यांनी) मंगळवारी रात्री 9 वाजता जेल कर्मचाऱ्यांशी वाद उरकून काढला. त्यानंतर कैदी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी जेलमधील दूरदर्शन संच फोडला व अन्य साहित्याची नासधूस केली. या घटनेची माहिती तातडीने कारवार शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या कारवारचे डीवायएसपी शिरीश यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणाली.