कबुतरांचा नाद...मारामारीपर्यंत वाद
शालेय-महाविद्यालयीन तरुणाईचा ओढा : अभ्यासाकडे दुर्लक्ष, पालकवर्ग चिंतेत
बेळगाव : व्यसनाधीनता, ऑनलाईन गेमिंग यांच्या विळख्यात अडकलेली शालेय व महाविद्यालयीन तरुणाई आता कबुतरांच्या नादापायी आयुष्य बरबाद करत आहे. एक हौस म्हणून कबूतर न पाळता एकमेकांवर ईर्षा व स्पर्धांसाठी त्याचा वापर केला जात आहे. यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात कबुतरांच्या स्पर्धांमधून वाममार्गाला लागत आहेत. त्यामुळे शिक्षकांसह पालकवर्गही चिंतेत सापडला आहे. शहरासह बेळगावच्या ग्रामीण भागात कबुतर पाळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सुरुवातीला काही शौकीन मंडळींच कबुतरे पाळत होती. परंतु आता गल्लोगल्ली कबुतरे पाळणारे युवक दिसत आहेत.
युवकांपाठोपाठ आता शालेय विद्यार्थीही कबुतरे पाळण्याच्या नादी लागली आहेत. यासाठी वारेमाप खर्च केला जात असून तो पालकांकडून घेतला जात असल्याने दररोज वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. कबुतर पाळणे हा छंद यापूर्वी शहरातील काही भागात दिसून येत होता. विशेषत: कॅम्प, गांधीनगर, आझमनगर, अमननगर या परिसरात कबुतरे पाळली जात होती. परंतु, त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पर्धांचे स्वरुप देण्यात आल्याने आता गावोगावी कबुतरे पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विद्यार्थी शाळेऐवजी कबुतरांच्या स्पर्धा भरवण्यामध्ये दंग असल्यामुळे पालकवर्गाची डोकेदुखी वाढली आहे.
चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ
कबुतरे पाळण्यासाठी युवकांनी मोठ्या ढाबळी तयार करून घेतल्या आहेत. त्यामध्ये कबुतरांना ठेवले जाते. परंतु, एकमेकांची कबुतरे चोरण्याचे प्रकारही वाढले आहेत. रात्री तसेच दिवसाढवळ्या घरांमध्ये घुसून कबुतरांची चोरी केली जात आहे. यामधून वादावादी तसेच मारामारीचे प्रकार घडत असल्याने हे वेळीच थांबवणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावरून स्पर्धांचे आयोजन
बेळगाव शहरासह तालुक्यातील अनेकांनी कबुतर पाळणाऱ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन सुरू केले आहे. यासाठी इन्स्टाग्रामचा वापर केला जात आहे. कबुतरांच्या नावाने इन्स्टाग्रामवर पेज तयार करून वेळ व ठिकाण ठरविले जात आहे. तसेच परीक्षकांना स्पर्धेसाठी पैसेही दिले जात आहेत. अशा प्रकारांमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी कबुतर पाळण्याच्या मोहजालात अडकून अभ्यासापासून दूर जात असल्याची तक्रार पालकवर्गातून केली जात आहे.