For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमासंघर्षावर तोडगा लागू होणार

06:58 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीमासंघर्षावर तोडगा लागू होणार
Advertisement

पंतप्रधान मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा : चीनसोबतचे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होण्याकडे वाटचाल

Advertisement

वृत्तसंस्था/ कझान (रशिया)

पाच वर्षांमध्ये प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात थेट चर्चा झाली आहे. दोन्ही नेते रशियातील कझान येथे ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी आले होते. परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाल्यानंतर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेऊन चर्चा केली. ही चर्चा द्विपक्षीय संबंध आणि जगातिक घडामोडींच्या संदर्भात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी लडाख सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी आणि तेथे 2020 ची स्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला आहे. या करारानुसार दोन्ही देशांच्या सेना त्यांच्या 2020 च्या स्थानी परत जाणार असून गस्तक्षेत्राची स्थितीही पूर्ववत केली जाणार आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये गेली चार वर्षे असणारा सीमातणाव बऱ्याच प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. या करारानंतर कझान येथे दोन्ही नेत्यांची भेट होईल असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. त्यानुसार दोन्ही नेत्यांची भेट बुधवारी आयोजित करण्यात आली.

दहशतवादावर दुहेरी भूमिका नको

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत भाषण करताना दहशतवादावर कोणत्याही देशाने दुहेरी भूमिका घेऊ नये, असे स्पष्ट प्रतिपादन केले होते. हा चीनलाही एक गर्भित संदेश होता. कारण चीनने पाकिस्तानमधल्या भारतविरोधी कारवाया करणाऱ्या काही दहशतवादी संघटनांना पाठीशी घातले होते. त्यामुळे भारत आणि चीनमधील तणावातही भर पडली होती. जिनपिंग यांच्याशी केलेल्या चर्चेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित करुन भारताची भूमिका पुन्हा एकदा चीनसमोर स्पष्ट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

द्विपक्षीय व्यापार, सीमातणाव

दोन्ही नेत्यांच्या चर्चेत लडाख सीमेवरील तणावाचाही विषय निघाला होता. यासंबंधी करण्यात आलेल्या कराराचे त्वरित क्रियान्वयन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारताच्या भूसेना प्रमुखांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हीच अपेक्षा जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली. तणावाचे प्रसंग पुन्हा निर्माण होऊ नयेत यावरही दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भेटीचे महत्व मोठे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांची ही भेट ‘ऐतिहासिक’ असल्याचे मत काही आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. पाच वर्षांच्या अंतरानंतर ही भेट झाली. गेली चार वर्षे लडाख सीमेवर दोन्ही देशांच्या सेना अनेक स्थानी एकमेकींसमोर उभ्या आहेत. गलवानचा रक्तरंजित संघर्षही झाला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये एकमेकांसमोर येऊनही प्रत्यक्ष एकास एक भेट आणि चर्चा टाळली होती. पण आता तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाल्याने ही भेट झाली. या भेटीमुळे कदाचित दोन्ही देशांमध्ये अधिक मैत्रीपूर्ण संबंधांची अपेक्षा केली जाऊ शकते, असे मत व्यक्त होत आहे.

भारताचे कूटनैतिक यश

चीनशी असलेल्या चार वर्षांच्या सीमातणावावर सातत्यपूर्ण प्रयत्न, त्याचसमवेत निर्धार आणि प्रतिकार यामुळे तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच कटुता विसरुन दोन्ही देशांचे प्रमुख नेते भेटल्याने हे भारताचे कूटनैतिक यश आहे, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनसंबंधीच्या विदेश नीतीवर नेहमी तोंडसुख घेणाऱ्या विरोधी पक्षांना, विशेषत: काँग्रेसलाही हा एक धक्का आहे, असेही प्रतिपादन अनेकांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.