चिमुकल्यासाठी जवान ठरला देवदूत
आठ महिन्यांच्या बाळाला जीवदान : चालत्या ट्रेनमध्ये सीपीआर देत वाचवले प्राण
वृत्तसंस्था/ कोची
भारतीय लष्कराच्या एका सैनिकाने ट्रेनमध्ये सीपीआर (कार्डियोपल्मोनरी रिसुसिटेशन) देऊन 8 महिन्यांच्या मुलाला वाचवले. आर्मी मेडिकल सर्व्हिसेस विंगने (डीजीएएफएमएस-एमओडी) शनिवारी यासंबंधीची माहिती दिली. 13 ऑक्टोबर 2025 रोजी दिल्लीहून दिब्रुगडला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये सुनील नामक जवानाने चिमुकल्याचे प्राण वाचवल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाला जीवदान मिळाल्यामुळे लष्करी जवान सुनील हा त्याच्यासाठी ‘देवदूत’ बनून आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एका नवजात बाळाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याचदरम्यान लष्कराचा एक सैनिक देवदूत बनून आला आणि त्याने सीपीआर देऊन मुलाचे प्राण वाचवले. रेल्वे प्रवासादरम्यान मुलाचा श्वास थांबल्यामुळे तो बेशुद्ध पडला. आपले मूल मृत झाल्याचे पाहून आईही बेशुद्ध पडला. कुटुंबातील इतर सदस्यही घाबरले होते. याचदरम्यान 456 फील्ड हॉस्पिटलमध्ये तैनात असलेला सुनील हा जवान त्याच डब्यातून प्रवास करत होता. तो रजेवरून परतत होता. त्याने लगेच परिस्थिती समजून घेत मुलाला सीपीआर दिले. जवानाने केलेल्या प्रयत्नामुळे चिमुकले बाळ पुन्हा शुद्धीवर आले. त्यानंतर सुनीलने रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि रेल्वे पोलिसांना माहिती दिली. आसाममधील रंगिया स्टेशनवर पुरेशी वैद्यकीय सेवा देण्यात आली. सुनीलच्या या प्रयत्नांचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.
प्राण कसे वाचवले?
456 फील्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिका सहाय्यक म्हणून तैनात असलेला लष्करी जवान सुनील रजेवरून ड्युटीवर परतत होता. तो त्याच डब्यात उपस्थित होता. गोंधळ ऐकून सुनील मुलाकडे धावला आणि त्याने मुलाचे हृदयाचे ठोके तपासण्यास सुरुवात केली. मुलाचा श्वासही थांबला होता. यानंतर सुनीलने ताबडतोब मुलावर सीपीआर सुरू केला. त्याने मुलाच्या छातीवर दोन बोटे ठेवली आणि त्याला तोंडातून ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. काही वेळ असे केल्यानंतर मुलाची थोडीशी हालचाल सुरू झाली. तो शुद्धीवर आला. त्यानंतर त्याला तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनीलने रेल्वे अधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांशी बोलून मुलाला आसाममधील रंगिया येथे दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. अशाप्रकारे, सुनीलच्या छोट्याशा प्रयत्नामुळे एका मुलाचा जीव वाचला.