सर्वात छोटे वॉशिंग मशिन
भारतीय लोकांना ‘जुगाड’ करणे आवडते, हे सर्वश्रुत आहे. ‘जुगाड’ याचा अर्थ एखादी अशी वस्तू किंवा अशी प्रक्रिया शोधून काढणे, की जी सहसा कोणाच्या मनातही येत नाही. अगदी टाकावू किंवा किरकोळ मानल्या गेलेल्या वस्तूंचा उपयोग करुन एखादी उपयुक्त वस्तू बनविणे, यालाही ‘जुगाड’ म्हणतात. अशाच प्रकारचा जुगाड करुन एका भारतीय युवकाने जगातील सर्वात छोटे वॉशिंग मशिन निर्माण केले आहे. या मशिनची नोंद गिनीज विक्रम पुस्तिकेतही झाली आहे.
या वॉशिंग मशिनचा आकार 37 मिलीमीटर गुणिले 41 मिलीमीटर गुणिले 43 मिलीमीटर इतका म्हणजे हाताच्या तळव्याइतका साधारणत: आहे. या मशिनमध्ये मोठे कपडे अर्थातच धुतले जात नाहीत. कपड्यांचे तुकडे मात्र धुवून स्वच्छ केले जाऊ शकतात. हे वॉशिंग मशिन इतर कोणत्याही आधुनिक मोठ्या वॉशिंग मशिनप्रमाणेच काम करते. त्याची काम करण्याची प्रक्रियाही समानच आहे. केवळ ते आकाराने अगदी लहान असल्याने वैशिष्ट्यापूर्ण मानले जात आहे.
या वॉशिंग मशिनसंबंधी सोशल मिडियावर बरीच उत्सुकता दिसून येत आहे. याच्या व्ह्यूजची संख्या पाहता ही बाब स्पष्ट होते. या मशिनचा नेमका उपयोग किती आणि कोणाला हा प्रश्न असला तरी, ते ज्याने बनविले आहे, त्याच्या ‘जुगाडी’ कौशल्याला लोक दाद देत आहेत. अगदी टाकावू वस्तूंपासून ते बनविण्यात आले आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा कोणताही उपयोग केलेला नाही. तथापि, त्याची प्रक्रिया मोठ्या वॉशिंग मशिनसारखीच असल्याने सध्या ते चर्चेचा विषय बनले आहे. अशा वस्तू निर्माण करणाऱ्या कल्पक युवकांना उत्तम अभियांत्रिकी शिक्षण मिळाले तर त्यांच्या हातून मोठे तंत्रज्ञान विकसीत होण्याची शक्यता आहे. याचा शिक्षणसंस्था आणि सरकारनेही विचार करावा. अशी गुणवत्ता केवळ ‘जुगाड’ करण्यात खर्च होऊ नये, अशा सूचना अनेकांनी केल्या आहेत.