जगातील सर्वात लहान नदी
नदी म्हणचे पाण्याचा एक मोठा प्रवाह, जो अनेक किलोमीटर लांब, एका विशिष्ट स्थानी उगम पावणारा आणि नंतर वाहत जाऊन अन्य नदीला मिळणारा किंवा समुद्राला मिळणारा अशी आपली समजूत आहे. ती खरीही आहे. कारण बहुतेक नद्या मोठ्या असतात आणि त्या अशीच मार्गक्रमणा करतात. तथापि, या जगात अशीही एक नदी आहे, की जी, नदी आहे यावर विश्वास बसणेही अशक्य आहे. अमेरिकेतील मोंटाना येथे रोए नावाची नदी आहे, जिची लांबी केवळ 201 फूट किंवा 61 मीटर आहे. ही नदी अमेरिकेतील मोठी नदी मिसुरी आणि ‘जायंट स्प्रिंग्ज’ यांच्या मधल्या भागात आहे. 1989 मध्ये गिनीज या जागतिक विक्रम पुस्तिकेत या नदीचा समावेश जगातली सर्वात कमी लांबीची नदी म्हणून करण्यात आला आहे. इतक्या कमी लांबीचा प्रवाह नदी म्हणून कसा ओळखला जातो, हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. तर या प्रश्नाचे उत्तर असे की, रोए नदीचा हा प्रवाह नदीच्या व्याख्येच्या सर्व अटी पूर्ण करतो. त्याचे उगमस्थान आणि त्याचे गंतव्य स्थान हे नदीच्या व्याख्येप्रमाणेच आहे. हा कृत्रिम किंवा तात्कालीन जलस्रोत नाही. हा प्रवाह कमी लांबीचा असला तरी तो सातत्याने गेली कित्येक शतके वहात आहे. तसेच तो अखंडपणे वाहत आहे. त्याची रुंदी त्याच्या लांबीच्या मानाने चांगली आहे. त्याची खोली सात ते आठ फूट आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे वैज्ञानिकदृष्ट्या या प्रवाहाला नदी म्हणूनच ओळखले जाते. जगात अशा छोट्या नद्या आणखीही आहेत. त्यामुळे काहीवेळा नेमकी कोणती नदी सर्वात लहान, असा वादही निर्माण होतो, तथापि, रोए हीच सर्वात लहान नदी मानली जाते.