सर्वात लहान उद्यान
उद्याने प्रत्येक शहरात किंवा छोट्या गावांमध्येही असतात, याची आपल्याला माहिती आहे. मित्र आणि परिवारासमवेत कित्येकदा लोक उद्यानांमध्ये जाऊन आपला शीण घालवितात. शहरांच्या योजनेमध्ये उद्यानांना मोठे महत्व दिलेले असते. उद्यानांसंबंधीची आपली कल्पना अनेक वृक्ष, फुलझाडे, मोकळी जागा, हिरवेगार गवत, पाण्याचे झरे एकत्रित पाहण्याचे एक स्थान अशीच असते.
कित्येक उद्याने शेकडो एकर भूमीत विस्तारलेली असतात. उद्यान जितके मोठे आणि विस्तीर्ण, तितके ते अधिक आकर्षक असेही आपण मानतो. तथापि, अमेरिकेच्या ऑरीगॉन प्रांतातील पोर्टलँड येथे एक उद्यान आहे. त्याचा समावेश गिनीजच्या विक्रमपुस्तिकेत करण्यात आला आहे. या उद्यानाचे क्षेत्रफळ केवळ 452 चौरस इंच किंवा साधारणत: दोन फूट गुणिले दोन फूट एवढे आहे. या उद्यानात एकच फुलझाडाप्रमाणे दिसणारा वृक्ष आहे. या एकवृक्षीय भूमीला उद्यान का म्हटले जाते, असा प्रश्नही अनेक जणांना पडतो. पण हे पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थळ आहे. या उद्यानाचे नाव ‘मिल एंडस् पार्क’ असे आहे.
त्याचा इतिहासही मनोरंजक आहे. 1946 मध्ये डिक फॅगन नामक एक सैनिक अमेरिकेच्या सेनेत होते. ते दुसऱ्या महायुद्धानंतर ऑरीगॉन येथे परतले. त्यांनी ऑरीगॉन जर्नल नामक नियतकालिकात पत्रकार म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या कार्यालयाबाहेरच एक अत्यंत गर्दीचा मार्ग होता. या मार्गानजीक एक मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यात वीजेचा खांब बसविण्याची योजना होती. तथापि, प्रशासनाने कित्येक वर्षे या खड्ड्यात खांब बसविला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी फॅगन यांनी या खड्ड्यात एक झाड लावले. त्यांनी यासंबंधी एक लेखही लिहिला. तसेच या स्थानाचे नामकरण केले. तेव्हापासून हे जगातील सर्वात लहान उद्यान म्हणून प्रसिद्धीस पावले आहे.