सर्वात छोटा मासा, केवळ नखाएवढा
आवाज बंदुकीच्या गोळीपेक्षाही वेगवान
पृथ्वीवर एकाहून एक रहस्यमय जीव असून त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर चकित व्हायला होते. आता वैज्ञानिकांना जगातील सर्वात छोटा मासा सापडला आहे. याची रुंद केवळ मानवी नखाइतकी आहे. परंतु त्याचा आवाज ऐकल्यावर कुणीही हादरून जाऊ शकतो. हा मासा बंदुकीच्या गोळीपेक्षाही अधिक वेगवान आवाज काढतो.
बर्लिनच्या वैज्ञानिकांनी म्यानमारच्या नद्यांमध्ये एक अनोखा मासा शोधला आहे. डेनियोनेला सेरेब्रम नावाचा हा मासा केवळ 12 मिलिमीटर लांबीचा असून पूर्णपणे पारदर्शक दिसून येतो. परंतु हा मासा 140 डेसिबलपेक्षा अधिक मोठा आवाज काढू शकताहे. हा आवाज बंदुकीची गोळी, रुग्णवाहिकांचा सायरन आणि जॅक हॅमरपेक्षाही मोठा आहे. सर्वसाधारणपणे प्राणी जितका मोठा तितका त्याचा आवाज मोठा असेल असे मानले जाते, परंतु वैज्ञानिकांनुसार स्वत:च्या आकाराच्या तुलनेत आतापर्यंत आढळलेला हा सर्वाधिक आवाज काढणारा मासा आहे.
वैज्ञानिकांनी हा मासा बर्लिन येथे आणला, तेथे संशोधनादरम्यान त्यांना अजब गोष्ट दिसून आली. पीनएएस नियतकालिकात प्रकाशित संशोधनाच्या मुख्य लेखिका वेरिटी कुक यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. डेनियोनेला सेरेब्रमचा आवाज इतका तीव्र आहे की माशांच्या टँकजवळून तुम्ही जात असताना हा आवाज ऐकू आला तर घाबरून जाल. हा प्रकार असाधारण आहे, कारण मासा अत्यंत छोटा आहे आणि आवाज अत्यंत मोठा आहे. प्रथम आम्हाला मोठा आवाज कोण काढतोय हेच कळत नव्हते. मग आम्ही मायक्रोफोन आणि हाय-स्पीड व्हिडिओ रेकॉर्डिंगचा वापर केल्यावर माशांचा आवाज समजू शकला. माशांच्या आवाजाचा बहुतांश हिस्सा पाण्यात परत परावर्तित होतो. याचमुळे या माशाच्या टँकनजीक उभे राहिल्यास पाण्यात कंपन दिसून येते. इतका मोठा आवाज काढणारा परंतु अत्यंत कमी आकाराचा असा प्राणी अन्य कुठलाच नसल्याचे कुक यांचे सांगणे आहे.
हाडं असलेल्या सर्व माशांमध्ये एक तरंगणारे मूत्राशय असते. एक गॅसने भरलेला अवयव जो त्यांना पाण्यात राहण्यास मदत करतो. अनेक मासे आवाज निर्माण करण्यासाठी स्वत:च्या स्नायूंचा वापर करतात. परंतु डेनियोनेला हा स्वत:च्या स्नायूंना आकुंचित करून घेतो, तो स्वत:च्या हाडांना खेचून घेतो, यामुळे आवाज निघतो. खास बाब म्हणजे या माशामध्ये केवळ नरच आवाज काढू शकतो. मादी माशाला असे करता येत नाही. म्यानमारच्या नद्यांमध्ये असलेल्या पाण्यामुळे या माशांमध्ये ही प्रवृत्ती निर्माण झाली असावी असे मानले जाते.