सर्वात छोटा पक्षी
आपण सर्वांनी आकाशात उडणारे पक्षी पाहिले आहेत, परंतु सर्वात छोटा पक्षी कोणता याचे उत्तर तुम्हाला माहित आहे का? निसर्गाने स्वत:च्या क्षमतेचा अद्भुत नमुना दाखवत एक असा गेंडस पक्षी तयार केला आहे, जो पाहिल्यावर प्रथमदर्शनी डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. परंतु हा पक्षी भारतात आढळून येत नाही. या पक्ष्याचे नव बी हमिंगबर्ड असून त्याला जगातील सर्वात छोटा पक्षी म्हटले जाते. बी हमिंगबर्ड क्यूबाच्या घनदाट जंगलांमध्ये आढळून येतो. याची लांबी केवळ 5-6 सेंटीमीटरपर्यंत असते. म्हणजेच एका बोटापेक्षाही कमी.
तर याचे वजनही फारच कमी असते. याचमुळे याला अनेकदा मधमाशी समजले जाते. कारण हा पक्षी उडताना मधमाशासारखाच आवाज काढत असतो. आकारात देखील हा पक्षी मधमाशाइतकाच असतो. बहुतांश पक्षी केवळ समोर उडू शकतात. तर बी हमिंगबर्ड मागील बाजूसही उडू शकतो. हा पक्षी स्वत:च्या चोचेला फुलात रुतवून त्यातील सत्व मिळवत असतो. या पक्ष्याच्या पंखांची हालचाल इतकी वेगवान असते, की ती उघड्या डोळ्यांनी टिपता येत नाही. हा पक्ष सेकंदात 80 पेक्षा अधिक वेळा पंख फडफडू शकतो. तर उडताना याच्या पंखांची हालचाल 200 प्रतिसेकंदापर्यंत पोहोचते.
बी हमिंगबर्ड नर आणि मादीत मोठे अंतर असते. नर अधिक चमकदार असतो, त्याच्या डोक्यावर अन् गळ्यावर इंद्रधनुष्यी रंग असतो. तर त्याचे पंख लाल किंवा नारिंगी रंगाचे असतात. तर मादीचा रंग फिकट असतो. बी हमिंगबर्ड स्वत:चे घरटे अत्यंत सुंदरपणे तयार करतो. हे घरटे सर्वसाधारणपणे झाडांच्या पातळ फांद्यांवर असते आणि ते इतके छोटे असते की त्यांना शोधणे अवघड ठरते. मादी पक्षी एकावेळी केवळ दोन अंडी देते. क्यूबामध्ये हा पक्षी घनदाट जंगल आणि खुल्या भागांमध्येही दिसून येतो. परंतु या गोंडस जीवाचे नैसर्गिक आवास वेगाने संपत जाणे, शहरीकरणामुळे जंगलतोड आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.