गतीमंद युवक नदीत बुडाला! म्हसवड येथील घटना, शोधकार्य सुरू
शेंबडेवस्ती येथील 18 वर्षीय हणमंत मोहन शेंबडे हा सातारा याठिकाणी मतीमंद शाळेत इयत्ता 10 वी मध्ये शिकत असून गौरी गणपतीची सुट्टी असल्याने घरी आला होता. रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान आई व हणमंत ही मायलेकरं शेतीला पाणी देण्यासाठी नदीपलीकडे असलेल्या विहिरीवरील मोटार चालू करण्यास निघाले होते. इतर व्यक्तीप्रमाणेच हणमंतही रस्सीला धरुन नदीपलीकडे जात होता. आई नदीकडेला थांबली होती. हणमंत मध्यभागी गेल्यावर त्याचा रस्सीवरील हात निसटला व तो आईच्या डोळ्यादेखत पाण्यात पडला. पोहता येत असतानाही पाण्यात गटांगळ्या खात असताना आई ही गतीमंद असल्याने ती ओरडू शकत नव्हती. मात्र आ-आ असा आवाज करत घराकडे गेली. पती व इतरांना नदीजवळ आणले. शोधाशोध करत असताना म्हसवड पोलीस, नगरपालिका यांना माहिती देण्यात आली. सर्व यंत्रणा रात्री आठपर्यंत शोध घेत होती. मात्र तपास लागला नाही.
म्हसवडनजीक शेंबडेवस्ती याठिकाणी राहणारे मोहन शेंबडे यांची पत्नी व मुलगा हणमंत हे दोघेही मतीमंद असून हणमंत हा सध्या सातारा याठिकाणी मतीमंद शाळेत इयत्ता 10 मध्ये शिकत आहे. 18 वर्षीय हणमंत मोहन शेंबडे गौरी-गणपती निमित्ताने शाळेला सुट्टी असल्याने घरी आला होता. रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान आईबरोबर तो माणगंगा नदीवर माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून बांधलेल्या बंधाऱ्याजवळील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विहीरीपासून नदीपलीकडे असलेल्या विहिरीवरील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी रस्सीच्या माध्यमातून हणमंत जात होता. तर आई नदीकडेला थांबली होती. हणमंत नदीच्या मधोमध गेल्यावर त्याचा रस्सीवरील हात निसटला व तो नदीपात्रात वाहत गेला. गटांगळ्या खात आईच्या डोळ्यासमोर आपला मुलगा आईकडे वाचवण्यासाठी हात करत होता. तर आई गतीमंद असल्याने ती बोलू शकत नव्हती, ओरडूही शकत नव्हत्या. मुलाकडे पाहून आकांताने आ-आ असे फक्त ओरडत होती. आईच्या डोळ्यादेखत बंधाऱ्याच्या अथांग पाण्यात त्यांचा हणमंत गायब झाल्यावर त्या ओरडत घरी जाऊन पती मोहन यांना सांगितले. नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
पालिकेचे पथक बोट घेऊन पाण्यात शोध घेत होते तर माणच्या प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसिलदार विकास आहेर, आ. जयकुमार गोरे, दहिवडी सपोनि अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि सखाराम बिराजदार, सर्कल अखडमल, आप्पासाहेब पुकळे, बाळासाहेब काळे, माजी नगरसेवक सुरेश पुकळे याठिकाणी उपस्थित राहून सूचना देत होते. सांयकाळी 5 वाजता सातारा येथून रेस्क्यू टीम व पाण्यातील कॅमेरा आणून पाण्यात बुडालेल्या हणमंत याचा शोध घेत होते.