बडेकोळ्ळमठ क्रॉसनजीकचा उतार अपघात प्रवण क्षेत्र
प्रवाशांनी वाहने जपून चालवण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन : एनएचआयच्या अधिकाऱ्यांना सुधार घडविण्याच्या केल्या सूचना
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ क्रॉसनजीकची उतार अपघातप्रवण बनली आहे. गेल्या दहा वर्षांत त्या ठिकाणी 19 जण ठार तर 87 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन दोघे जण ठार झाल्याने पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी स्वत: बडेकोळ्ळमठ क्रॉसनजीकच्या उताराला भेट देऊन पाहणी केली. तसेच यावर उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिली. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बेळगावहून धारवाडकडे जाणारा रस्ता बडेकोळ्ळमठ क्रॉसनजीक धोकादायक बनला आहे. सुवर्णविधानसौधपासून पुढे गेल्यानंतर बडेकोळ्ळमठ क्रॉस येतो. त्या ठिकाणी वळण आणि उतार आहे.
त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवरील चालकांचा ताबा सुटत आहे. यापूर्वीदेखील सदर ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. त्यात आतापर्यंत 19 जणांना प्राण गमवावे लागले असून तब्बल 87 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी दोन ट्रक, दोन कार आणि दोन दुचाकींमध्ये विचित्र अपघात होऊन दोघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले होते. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बडेकोळ्ळमठ क्रॉसनजीकच्या अपघातप्रवण ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली. तातडीने त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनादेखील बोलावून घेतले. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिका रोखण्यासाठी बडकोळ्ळमठ क्रॉस उतारावर खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात. जेणेकरून अपघातांवर नियंत्रण आणता येईल, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
वाहनांचा वेग मर्यादित ठेवा
सध्या पावसाळा सुरू असल्याने उतारतीला वाहनांना ब्रेक लागत नाही. उतारती आणि वळणावर पाणी तुंबत असल्याने वाहने घसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वाहनचालकांनी येथून प्रवास करताना काळजी घ्यावी. वाहने हळू चालवावीत. अतिवेगाने गेल्यास वाहनावरील ताबा सुटण्याची शक्यता आहे. वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी वाहनचालकांना केले आहे.