पावसाची ‘सहामाही’
जून ते सप्टेंबर हा पावसाचा प्रमुख हंगाम मानला जातो. तथापि, यंदाचे वर्ष सर्वार्थाने वेगळे ठरले. यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुऊवात झाली. मेपासून ते सप्टेंबरपर्यंत सलग पाच महिने देशाच्या विविध भागांत दणकून पाऊस झाला. आता सहाव्या महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे वर्षातील बारा महिन्यांपैकी तब्बल सहा महिने पावसाचे ठरत आहेत. पावसाची ही सहामाही महाराष्ट्रासह देशातील नागरिकांसाठी कठीण परीक्षेसारखीच ठरली आहे. या काळात अतिवृष्टी, ढगफुटी व महापुरासारख्या घटनांची मोठ्या प्रमाणात नोंद झाल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आता अधिकच ऐरणीवर आल्याचे दिसून येते.
नैर्त्रुत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून हे भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशासाठी एक वरदान मानले जाते. मान्सूनचा प्रवास अंदमान व निकोबार बेटापासून प्रवास होतो. साधारण 20 मेच्या आसपास मान्सून अंदमानात दाखल होतो. मात्र, यंदा मोसमी वारे वेळेआधीच म्हणजेच 13 मे रोजी अंदमानात सक्रिय झाले. त्यानंतर 24 मेमध्ये केरळात मोसमी पावसाचे आगमन झाले. तर 29 जूनला त्याने संपूर्ण देश व्यापला. साधारण 15 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो. यंदा त्याने 15 ते 17 दिवस आधीच देश व्यापल्याचे पहायला मिळाले. मे महिन्यात पावसाने जबर तडाखा दिला. त्यानंतर जूनमध्येही चांगला पाऊस झाला. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहिले. त्यानंतर अर्धा ऑगस्ट व सप्टेंबरही पावसाने गाजवला. यंदाचा हंगाम अधिकृतरित्या नुकताच संपला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात विक्रमी 108 टक्के पाऊस बरसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. यावषी जून महिन्यात सरासरीच्या 109, जुलै ऑगस्ट महिन्यात 105, तर सप्टेंबर महिन्यात 115 टक्के पाऊस बरसला. 2001 पासूनचे पाचवे विक्रमी, तर 1901 नंतरचे 38 वे सर्वाधिक पावसाचे हे वर्ष ठरले आहे. बिहार, आसाम, मेघालय तसेच अऊणाचल प्रदेश या राज्यात यंदा तुटीचा पाऊस नोंदविण्यात आला आहे, तर राजस्थानमध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. याशिवाय जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदिगढ, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक या भागात अतिरिक्त पाऊस पडला आहे. महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटक राज्यातदेखील यंदाच्या हंगामात दमदार पाऊस नोंदविण्यात आला. सप्टेंबर महिन्यात पावसाची तीव्रता अधिक राहिली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 20 टक्के अधिकचा पाऊस
यंदाच्या पावसाच्या हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 20 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला असून, राज्यात अतिरिक्त पाऊस झाला आहे. राज्याचे बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असला, तरी सातारा जिल्ह्यात तुलनेत कमी पाऊस झाला आहे. विशेषत: सप्टेंबरमध्ये पावसाने अनेक जिल्ह्यात हाहाकार उडवला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दाणादाण उडवल्याचे चित्र पहायला मिळाले. सीना नदीच्या पुरात धाराशिव, सोलापूर पाण्यात गेले. या पुराने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. अनेक भागांतील लाखो हेक्टरवरील पिके मातीमोल झाली. महाराष्ट्राच्या इतिहासातला यंदाचा हा विक्रमी पाऊस ठरला. धाराशिवमध्ये अतिवृष्टी झाली. तेथे सरासरीच्या 61 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला. कोल्हापुरात सरासरीच्या 27 टक्के अधिक, नाशिक 48, नगर 36, छत्रपती संभाजी 42, बीड 45, सोलापूर 20, लातूर 47, परभणी 31, नांदेड 49, वाशिम 23, यवतमाळ 26, वर्धा 23, चंद्रपूर 21, तर गडचिरोलीमध्ये सरासरीच्या 26 टक्के अधिकचा पाऊस झाला. याबरोबरच मुंबई शहर 8, ठाणे 12, रायगड 12, पुणे 16, रत्नागिरी 16, सिंधुदुर्ग 4, तर सांगलीत 14 तसेच उर्वरित जिल्ह्यात पावसाची समाधानकारक स्थिती दिसून आली.
परतीचा पाऊस रखडला
दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीचा मान्सून आठवडाभर रखडला. तसेच ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या अधिकचा पाऊस आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. परतीच्या पावसाला राजस्थानमधून 14 सप्टेंबरला सुऊवात झाली. सध्या तो गुजरात, मध्य प्रदेश तसेच पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत येऊन पोहचला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी निर्माण होणार असून, ते ओडिशा आंध्र किनारपट्टी पार करीत पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. यामुळे पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार आहे. या क्षेत्रामुळे परतीचा मान्सून रेंगाळला असून, आठवडाभर त्याला ब्र्रेक मिळणार आहे. त्यामुळे ईशान्य मोसमी पाऊसदेखील उशिरा आगमन करण्याची शक्मयता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ला निनोचा शक्मयता 70 टक्के
थंडीच्या हंगामात ला निनोचा शक्मयता 70 टक्क्मयांनी अधिक आहे. यामुळे थंडी अधिक कडक राहण्याची शक्मयता वर्तविली जात असली तरी थंडीवर इतर अनेक घटक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे नेमके थंडीचे प्रमाण कसे राहणार, हे समजण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
ऑक्टोबरवरही पावसाचे सावट
राज्याच्या अनेक भागात ऑक्टोबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. या महिन्यात किमान तापमान सरासरीच्या अधिक, तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सूनने अद्याप ब्रेक घेतलेला नाही. त्यात रिटर्न मान्सूनही अजून यायचा आहे. याचा विचार केला, तर ऑक्टोबरही पावसाळी ठरण्याची चिन्हे आहेत. स्वाभाविकच दिवाळी सणावरही पावसाचे सावट असल्याचे दिसून येते.
पावसाचा असमतोल
जागतिक तापमानवाढ आणि त्याचा मान्सूनवर होणारा परिणाम आता अधोरेखित झाला आहे. तापमानवाढीमुळे मान्सून लहरी झाला असून, त्याचे आगमन, पावसाची तीव्रता तसेच परतीचा प्रवासदेखील बदलत चालला आहे.
पावसाचा बदलता पॅटर्न
पावसाचा बदलता पॅटर्न हे या वर्षीच्या पावसाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्या ठरले. मे महिन्यातच अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस पडला. तासाभरात शंभर ते दीडशे मिमी इतक्या विक्रमी स्वऊपात झालेल्या या पावसाने काही शहरातील नियोजन व्यवस्थेचा अगदी बोजबारा उडवला. पुण्यातील हिंजवडी आयटीसिटी यंदा पाऊस हंगामात तीन ते चारवेळा पाण्यात बुडाल्याचे दृश्य बघायला मिळाले. खरे तर मराठवाडा हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पण, या भागालाही पावसाने जबर तडाखा दिला. त्यामुळे सुक्या दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले.
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका गडद
मागच्या अनेक वर्षांपासून निसर्गाचे बदलते चक्र, ढगफुटी, दुष्काळ, हिमनद्यांचे वितळणे, थंडी व उष्णतेच्या लाटा याला जागतिक तापमानवाढ हा घटक कारणीभूत असल्याची मांडणी केली जात आहे. देशातील यंदाच्या पावसाने याला पुष्टीच मिळाल्याचे दिसत आहे. अशातच आगामी 15 वर्षात आशिया, युरोप, आफ्रिका तसेच अमेरिकेतील काही शहरांतील पाणी पूर्णपणे संपणार (डे झिरो ड्रॉट) असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. तीव्र दुष्काळामुळे भविष्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य वाढणार असून, याचा सर्वात मोठा धोका शहरी भागांना आहे, असे यात म्हटले आहे. ‘नेचर’ संशोधनपत्रिकेत हा लेख प्रसिद्ध झाला आहे. रिपब्लिकन ऑफ कोरियाच्या पुसान विद्यापीठाच्या आयबीएस सेंटर फॉर क्लायेमट फिजीक्स सेंटरच्या संशोधकांनी हे लिखाण प्रसिद्ध केले आहे. यानुसार जागतिक तापमानवाढीमुळे सततच्या दुष्काळामध्ये वाढ होणार असून, यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य होणार आहे. परिणामी कृषी क्षेत्रासह अनेक बाबींवर याचा परिणाम होणरा असून, यामुळे शहरेदेखील तहानलेली राहणार आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे भूगर्भातील पाणीसाठा आटत चालला आहे, तर बर्फ वितळल्यामुळे अनेक प्रदेश कोरडे पडत आहेत. पाण्याच दुर्भिक्ष्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे शहर 2018 साली ड्राय शहर अर्थात पाणी नसलेले शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भारतात 2019 साली चेन्नई शहराचीदेखील अशीच अवस्था झाली होती. याला शास्त्राrय भाषेत ‘डे झिरो ड्रॉट’ असे संबोधले जाते. भविष्यात अनेक शहरांची अशीच अवस्था होणार असल्याचे या संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आणखी गडद होण्याची भीती आहे.
- अर्चना माने-भारती, पुणे