काश्मीरमधील स्थिती आता नियंत्रणात’
वृत्तसंस्था / श्रीनगर
काश्मीरमधील स्थिती आता नियंत्रणात आणण्यात आली आहे. गेले काही दिवस या केंद्रशासित प्रदेशात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने डोके वर काढले होते. तथापि, केंद्रीय राखीव पोलिस दलाने आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सर्व केंद्रीय सुरक्षा दले आता परस्परांमध्ये योग्य समन्वय ठेवून काम करीत आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात एकात्म अभियान चालविले जात असून काश्मीर खोऱ्याला दहशतवादमुक्त करण्याचे सुरक्षा यंत्रणांचे ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्ततेच्या दिशेने केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची वेगाने वाटचाल चाललेली आहे. जम्मू-काश्मीरच्या पोलीस दलाचेही योग्य ते सहकार्य आम्हाला मिळत आहे. असे प्रतिपादन केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सीआरपीएफच्या वतीने जम्मू-काश्मीरमध्ये एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सीआरपीएफचे प्रमुख अधिकारी अनिश दयाळ सिंग यांनी ही माहिती दिली. ही स्पर्धा सीआरपीएफ करंडक या नावाने ओळखली जात आहे. या स्पर्धेत काश्मीर भागातले 14 संघ भाग घेत आहेत. यांपैकी 12 संघ श्रीनगरमधील असून एक संघ बडगाम आणि 1 संघ गांदरबाल जिल्ह्यातील आहे. ही स्पर्धा शेरे काश्मीर मैदानात होत आहे.